जिल्हा बँक निकालानंतर भाजपमध्ये उत्साह;’नाद करायचा नाय’ असे झळकलेत विशाल परब यांनी बॅनर
*⚡सावंतवाडी ता.०२प्रसन्न गोंदावळे-: नुकत्याच झालेल्या सिंधुदुर्ग ज़िल्हा बँक निवडणुकीत मिळविलेल्या विजयाने भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये नवा आत्मविश्वास आणि उत्साह संचारला आहे. युवा नेते विशाल परब यांनी ज़िल्ह्यात ठिकठिकाणी लावलेल्या बॅनरमुळे हे स्पष्ट होत असून हे बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. या बॅनरवरील केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची आसनारूढ प्रतिमा आणि ‘नाद करायचा नाय’ असा उल्लेख राणे यांच्या कुशल नेतृत्वावरील अतूट विश्वास दर्शवित आहे.
कार्यकर्त्यांचा हा उत्साह आणि आत्मविश्वास आगामी निवडणुकांमध्ये भाजपसाठी फार महत्वाचा ठरणार आहे. सिंधुदुर्ग ज़िल्हा बँकेची निवडणूक नुकतीच पार पडली. गेल्या काही वर्षात ज़िल्हा बँकेवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचीच सत्ता होती. पण २०१९ च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान झालेल्या काही राजकीय घडामोडींमुळे ही बँक विरोधकांच्या ताब्यात गेली होती. त्यामुळे ही निवडणूक राणे यांच्यासाठी महत्वाची आणि कसोटीची होती. या निवडणुकीमुळे त्यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली होती, असे म्हटले तरी वावगे ठरू नये.
दुसरीकडे शिवसेनेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही ज़िल्हा बँकेवर सत्ता मिळविण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त केली. राज्यातील महाविकास आघाडी कायम ठेवून तीनही मित्र पक्षांनी आपले उमेदवार आखाड्यात उतरले होते. एकूण १९ जागांसाठी ही निवडणूक लढविण्यात आली. माजी ज़िल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, राजन तेली यांच्यासह राष्ट्रवादीचे सुरेश दळवी, काँग्रेसचे विकास सावंत आदी दिग्गज आखाड्यात उतरल्याने निवडणुकीत चांगलीच रंगत भरली होती. दोन्ही बाजूचे पारडे समसमान असल्याने निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. एकमेकांची उणी-धुणी काढण्यात दोन्ही बाजूकडून कोणतीही कसर सोडण्यात आली नाही. अखेर निवडणुकीचा निकाल स्पष्ट झाला आणि या सर्व नाट्यावर पडदा पडला. चुरशीच्या निवडणुकीत भाजपने १९ पैकी ११ जागांवर विजय मिळवून ज़िल्हा बँक ताब्यात घेतली.
ज़िल्ह्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून विजयोत्सव साजरा केला. या अतुलनीय विजयाचे द्योतक म्हणून भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी ज़िल्ह्यात ठिकठिकाणी लावलेले बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. या बॅनरवरील केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा आसनारूढ फोटो आणि ‘नाद करायचा नाय’ असा उल्लेख राणे यांचे राजकीय सामर्थ्य आणि कुशल नेतृत्व यावरील अतूट विश्वास दर्शवित आहे. सावंतवाडी शहरात नगरपालिकेसमोर आणि बापूसाहेब महाराज यांच्या पुतळ्यानजीक असे दोन ठिकाणी हे बॅनर लावण्यात आले आहेत. भाजपचे ‘ युथ आयकॉन’ विशाल परब हे युवा कार्यकर्त्यांचे ‘आयकॉन’ असून राणे परिवाराचे निकटवर्तीय आहेत. ज़िल्हा बँक निवडणुकीच्या विजयात त्यांचे महत्वाचे योगदान आहे. आपली जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडून आपल्यातील नेतृत्व गुण आणि कार्यक्षमतेची चुणूक दाखविली आहे. भविष्यात त्यांच्याकडे मोठे पद अथवा जबाबदारी आल्यास ते त्यातही यशस्वी होतील, यात तिळमात्र शंका नाही.
