*⚡सावंतवाडी ता.०२-: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय रांगोळी स्पर्धेत पाचवी ते सातवी गटात पावशी-मिटक्याची वाडी (ता. कुडाळ) शाळेची विद्यार्थिनी प्राची सावंत हिने साकारलेल्या ‘हुतात्मा बाबू गेनू यांचे स्वातंत्र्य लढ्यातील बलिदान’ या रांगोळीने प्रथम क्रमांक पटकावला.
या स्पर्धेला मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, शिक्षणाधिकारी डॉ. मुश्ताक शेख यांनी भेट देऊन स्पर्धकांचे कौतुक केले. पाचवी ते सातवी या गटात आठ तालुक्यातील शाळांच्या विद्यार्थ्यांनी एकूण २४ रांगोळ्या साकारल्या. मिटक्याची वाडी शाळेतील प्राची सावंतने ‘हुतात्मा बाबू गेनू यांचे स्वातंत्र्य लढ्यातील बलिदान” या रांगोळीतून देशभक्ती, असहकार, राष्ट्रीय शिक्षण, स्वदेशीचा स्वीकार व परदेशी मालावर बहिष्कार ही पंचसूत्री मांडली.
स्पर्धेचे परीक्षण कलाशिक्षक चिऊलकर व प्रशांत राणे यांनी केले. प्राचीला शाळेच्या मुख्याध्यापिका मानसी सावंत, आनंद परूळेकर, महानंदा चव्हाण, आदिती मसुरकर, जनार्दन माधव, कलाप्रेमी शिक्षक सहदेव पालकर आणि वर्गशिक्षक अमीर सातार्डेकर यांचे मार्गदर्शन लाभले. वेताळ-बांबर्डे केंद्र, हुमरमळा प्रभाग, कुडाळ तालुका व सिंधुदुर्ग जिल्हा या स्तरावर प्राचीने चढत्या श्रेणीमध्ये यश संपादन केले आहे. तिच्या यशात पालक, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ, माता पालक संघ पोषण आहार समिती, अंगणवाडी ताई, केंद्रप्रमुख भिकाजी तळेकर, कुडाळ गटशिक्षणाधिकारी सुनिता भाकरे या सर्वांचे योगदान असल्याचे प्राची हिने सांगितले. प्राचीने मित्र-मैत्रिणीसह हात धुवा दिन, संविधान दिन, गणित दिन अशा विशेष प्रसंगी लक्षवेधी रांगोळ्या साकारल्या आहेत. या यशाबाबत तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
