*⚡सावंतवाडी ता.०१सहदेव राऊळ-: मळगाव तेलकाटावाडी येथील ग्रामस्थांचा गोठण जेवण कार्यक्रम आज श्री देव दोन पूर्वस मंदिरात उत्साहात साजरा करण्यात आला. मळगाव परिसरातील लोकांनी या गोठण जेवण कार्यक्रमाचा लाभ घेतला. शेतकरीबंधू दरवर्षी हा गोठण जेवण कार्यक्रम करत असतात.
गावातील प्रत्येक वाडीतील शेतकरी आपल्या सोयीप्रमाणे गोठण जेवण कार्यक्रम करत असतात. रानटी प्राण्यांपासून आपल्या गुरांचे रक्षण व संवर्धन करणे, शेतीचे रक्षण व संवर्धन करणे, बाहेरच्या ईडापीडापासून संरक्षण करणे या उद्देशाने दरवर्षी हा गोठण जेवण कार्यक्रम केला जातो. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मळगाव तेलकाटावाडी येथील ग्रामस्थांचा गोठण जेवण कार्यक्रम आज श्री देव दोन पूर्वस मंदिर येथे उत्साहात साजरा झाला. यानिमित्त मंदिरात गेल्यावर सर्वांनी सर्वप्रथम दोन पूर्वस देवाचे दर्शन घेतले. काहींनी देवाला केळी, नारळ, नवसाचे पेढे, लाडू ठेवले. त्यानंतर दोन पूर्वस देवाची पूजा करण्यात आली. पूजा झाल्यावर सामूहिक जेवण बनविण्यास प्रारंभ झाला. जेवण झाल्यावर दोन पूर्वस देवाला नैवेद्य दाखवून देवाला सामूहिक गाऱ्हाणे घालण्यात आले. गाऱ्हाणे झाल्यावर जेवणास प्रारंभ झाला. जेवणानंतर पुन्हा गाऱ्हाणे घालून प्रसाद वाटप करण्यात आले. मळगाव रस्तावाडी परिसरातील लोकांनी या गोठण जेवण कार्यक्रमाचा लाभ घेतला. गोठण जेवण कार्यक्रमात तेलकाटावाडीतील सर्व ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग दर्शविला.
