*⚡सावंतवाडी ता.२५-:* जानेवारी २०२२ मध्ये सावंतवाडी येथे होणाऱ्या सोळाव्या निमंत्रितांच्या विभागीय कवयित्री संमेलनानिमित्त नवोदित कवयित्रींसाठी काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन केले आहे. नवोदित कवयित्रींनी आपल्या स्वलिखित कविता पाठवून या संधीचा फायदा घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सावंतवाडी शहरात भरविल्या जाणाऱ्या निमंत्रितांच्या विभागीय कवयित्री संमेलनाच्या निमित्ताने आरती मासिक प्रतिवर्षी सिंधुदुर्ग-गोवा मर्यादित काव्यलेखन स्पर्धा घेत असते. नव्या लिहित्या हातांना प्रोत्साहन मिळावे, त्यांना नवे व्यासपीठ मिळावे हा त्या मागचा हेतू असतो. पुढील वर्षी म्हणजेच २०२२ मध्ये सोळावे निमंत्रितांचे विभागीय कवयित्री संमेलन २९ जानेवारी २०२२ रोजी सावंतवाडीत आयोजित केले असून त्यानिमित्ताने नवोदित कवयित्री काव्य लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धेत यशस्वी स्पर्धकांना रोख रक्कम प्रमाणपत्र असे पारितोषिक जाणार आहे. सोबतच त्यांना संमेलनात निमंत्रित नामवंत कवयित्री सोबत आपल्या कविता सादर करण्यासाठी संधी मिळणार आहे. पाठविलेल्या कवितांना आरती मासिकातून योग्य प्रसिद्धीही दिली जाणार आहे. या संधीचा अठरा वर्षांवरील कवयित्रींनी अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन ‘आरती’चे संपादक प्रभाकर भागवत व कवयित्री उषा परब यांनी केले आहे. कविता अप्रकाशित व स्वतःची असावी, दीर्घ कविता नसावी. आपल्या उत्तम दोन कविता आयोजकांकडे पाठवाव्यात. त्यासाठी स्वतःचे नाव, पत्ता व मोबाईल नंबर लिहावा. कविता १८ जानेवारी २०२२ पर्यंत उषा परब, ‘स्नेहांकुर’, सर्वोदयनगर सावंतवाडी, ता. सावंतवाडी, जिल्हा- सिंधुदुर्ग (भ्रमणध्वनी- ९४२३८ १८८२८.) या पत्त्यावर पाठवावी. सिंधुदुर्ग व गोव्यातील नवोदित कवयित्रींनी या स्पर्धेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
