बांदा येथील द. भि. खानोलकर जनसेवा निधी संस्थेमार्फत दिले जाणारे पुरस्कार जाहीर

*⚡सावंतवाडी ता.२४-:* बांदा येथील सेवाभावी व्यक्तिमत्व स्वर्गीय डॉ. द. भि. खानोलकर यांच्या जनसेवा निधी बांदा या संस्थेमार्फत दिले जाणारे २०२१ चे पुरस्कार जाहीर झाले असून आदर्श प्राथमिक शिक्षक पुरस्कार माडखोल शाळा नं. २ चे शिक्षक अरविंद सरनोबत, माध्यमिक शिक्षक पुरस्कार कुडासे सरस्वती विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेजचे क्रीडाशिक्षक सोमनाथ गोंधळी, नारायण यशवंत तथा नाना तारी आदर्श समाजसेविका पुरस्कार निरामय केंद्र कोलगावच्या वंदनाताई करंबळेकर यांना देण्यात तर वि. न. नाबर पुरस्कार गुरुदास कुसगावकर यांना देण्यात येणार असून श्रीमती हेलन रॉड्रिक्स यांना यावेळी जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

आदर्श प्राथमिक शिक्षक पुरस्कारासाठी निवड झालेले अरविंद सरनोबत हे शाळेच्या गरजा व भौतिक गरजा आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी विविध स्पर्धा स्पर्शाने व अभियान यांच्यासाठी नेहमी कार्यरत असतात. आदर्श माध्यमिक शिक्षक पुरस्कारासाठी निवड झालेले सोमनाथ गोंधळी हे कुडासेसारख्या दुर्गम व ग्रामीण भागात कार्यरत असून ते क्रीडा शिक्षक आहेत. आपल्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आत्तापर्यंत विविध मैदानी खेळांमध्ये २३ राष्ट्रीय खेळाडू ७२ राज्यस्तरीय खेळाडू घडवले आहेत. बेसबॉल आणि सॉफ्ट बॉल या मैदानी खेळांचे ते राज्यस्तरीय प्रशिक्षक आहेत. स्व. नाना तारी पुरस्काराने सन्मानित वंदनाताई करंबेळकर या नारायण आश्रम कोळशीचे डॉक्टर शरश्चंद्र कुलकर्णी, ओटवणेचे दामले काका यांच्यासोबत स्वतः काम करून त्यांचाच आदर्श वसा पुढे चालवत आहेत. तसेच वसुंधरा विज्ञान केंद्रांमध्ये ही त्यांनी काम केले आहे. या सर्वांच्या आशीर्वाद आणि प्रेरणेने त्यांनी निरामय विकास केंद्र कोलगाव येथे सुरू केले आहे, ग्रामीण भागातील महिला आणि मुली यांचे आरोग्य आणि शिक्षण यासाठी त्या निरंतर झटत आहेत. यामध्ये महिलांना व मुलींना त्यांचा व्यवसाय व उपजीविका यासाठी त्या मार्गदर्शन व आर्थिक भारही उचलत आहेत. अशा या व्यक्तिमत्त्वाला सन्मानित करण्यासाठी संस्थेने आदर्श समाजसेविका या पुरस्कारासाठी निवड केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आदर्श प्रशासन आणि थोर शिक्षण तज्ञ वि. न तथा तात्यासाहेब नाबर यांच्या स्मृतीचे जतन करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापकांना उत्कृष्ट प्रशासक म्हणून गुरुवर्य तात्यासाहेब नाबर पुरस्काराने सन्मानित केले जाते. यावर्षी न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कसालचे मुख्याध्यापक गुरुदास गोविंद कुसगावकर यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. कुसगावकर यांनी न्यू इंग्लिश स्कूल ओरस येथे २३ वर्ष तर न्यू इंग्लिश स्कूल कसाल या प्रशालेमध्ये चार वर्ष मुख्याध्यापक म्हणून यशस्वीरित्या काम केले आहे. शाळेच्या भौतिक सुविधा बरोबरच मुलांचा सर्वांगीण विकास व शिस्त याकडे त्यांचा कटाक्ष असतो. प्रशालेमध्ये विविध उपक्रम राबवून प्रशासक व संघटक म्हणून जिल्ह्यात नावलौकिक मिळवला आहे. या व्यतिरिक्त सामाजिक व संघटनात्मक जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीरित्या स्वीकारल्या आहेत. जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित श्रीमती हेलन रॉड्रिक्स या सध्या शिक्षण प्रसारक मंडळाने सुरू केलेल्या वि. न. नाबर इंग्लिश मीडियममध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. बांदा नव्हे तर कोलझर कुंब्रल सारख्या ग्रामीण भागामध्ये अगदी तन मन लावून त्यांनी काम केले आहे. या शाळेच्या प्राथमिक अवस्थेत अल्पशा मानधनावर त्यांनी निस्वार्थी भावनेने ज्ञानदानाचे काम केले आहे,या कामाची पोचपावती म्हणून संस्थेने त्यांना जीवनगौरव पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्याचे निश्चित केले आहे. याव्यतिरिक्त बांदा केंद्रातून विविध विषयात शालांत परीक्षा मार्च २०२१ मध्ये प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांनाही रोख पारितोषिक देऊन सन्मानित केले जाणार आहे. यामध्ये अदिती देसाई, प्रकाश येडवे, तन्वी बांदेकर व बारावी परीक्षेत बांदा केंद्रातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण एकता सावंत मोर्य, यांचा समावेश आहे. पुरस्कार वितरण सोहळा जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा बांदा नं. १ च्या सभागृहात दुपारी ३.३० वाजता डॉ. प्रवीणकुमार ठाकरे सिंधू मित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान अध्यक्ष यांच्या हस्ते होणार आहे.

You cannot copy content of this page