परशुराम उपरकर यांचा दावा;अवैध धंद्यांना निर्बंध लावण्याची गरज
*⚡कणकवली ता.२४-:* पर्यावरण प्रदूषण आणि अवैध उत्खनलाला गेली ३ वर्ष प्रोत्साहन देणारे अप्पर जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांची काल जिल्ह्यातून बदली झाली. मनसेने अप्पर जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांच्या बदलीसाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यामुळे नवीन येणाऱ्या अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी आणि अन्य अधिकाऱ्यांनी या अवैध धंद्यांना निर्बंध लावण्याची गरज आहे,अशी अपेक्षा मनसे सरचिटणीस माजी आम.परशुराम उपरकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. कणकवली येथे मनसे संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत मनसे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर बोलत होते.
परशुराम उपरकर म्हणाले, अप्पर जिल्हाधिकारी यांनी तडजोड करून जमिनीचे निवाडे केले होते. त्यामुळे जनतेला उच्च न्यायालयातही दाद मागायला जावे लागले होते. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी अवैध उत्खननाचे डंपर पकडले गेल्यावर त्यांची सुटकादेखील केली होती. कासार्डे भागातील सिलिका मायनिंग होऊन कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडला आहे. याविषयी मनसे ने पाठपुरावा केला होता. 24 तारीखला मोर्चा काढला होता. परंतु तेव्हा दिलेल्या आश्वासनांची पूर्तता संबंधित विभागाने न केल्यामुळे मनसे परत आंदोलन करणार आहे. अप्पर जिल्हाधिकाऱ्यांविषयी जनतेच्या मनात प्रचंड द्वेष आणि राग होता. चोरट्या वाळूच्या तक्रारी करूनही कोणत्याही प्रकारची कारवाई होत नव्हती. आता त्यांची बदली झाल्यामुळे या सर्वांवर कुठेतरी आळा घातला गेला पाहिजे.
नवीन अप्पर जिल्हाधिकारी आणि अन्य अधिकाऱ्यांनी अवैध उत्खननावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. भरधाव डंपरचा, उत्खननाचा त्रास यावर विचार व्हायला हवा. नदितल्या चोरट्या वाळूवर तसेच सीआ झेड मधील वाळू उत्खननावर कारवाई व्हावी. याविषयी मनसे सातत्याने पुढाकार घेणार असून असे न झाल्यास मनसे पुन्हा आवाज उठवेल, असा इशारा देखील परशुराम उपरकर यांनी दिला आहे.
