समाजकल्याण सभापती अंकुश जाधव भडकले
ओरोस ता.२३-:सभेला अनुपस्थित राहणाऱ्या सदस्य व अधिकारी यांच्यावर सभापती अंकुश जाधव यांनी जोरदार ताशेरे ओढताना मागासवर्गीय समाजाच्या विकासाबाबत नेहमी असेच केले जाते. अधिकारी-कर्मचारी यांना काम करायचे नसते. तर सदस्य गैरहजर राहतात. मात्र, कामे मंजूर झाली नाही की ओरड मारतात, असे सांगितले.
स्वखुशीने निवडणूक लढवत सदस्य बनलेले असताना सभाना येण्याचे टाळल्याने विकासात्मक चर्चा करता येत नाही, दोडामार्ग सभापती कधीच येत नाहीत, असेही ते म्हणाले. समाजकल्याण समितीची तहकूब सभा आज बॅ नाथ पै सभागृहात सभापती जाधव यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झाली. यावेळी मालवण सभापती अजिंक्य पाताडे, सदस्य शारदा कांबळे, समाजकल्याण अधिकारी श्याम चव्हाण आदी उपस्थित होते. तहकूब सभेला सुद्धा सदस्यांनी पाठ फिरवली. तसेच शिक्षण, ग्रामीण पाणी पुरवठा, बांधकाम विभागाचे अधिकारी किंवा प्रतिनिधी सुद्धा सभेला उपस्थित नसल्याने सभापती जाधव आक्रमक बनले. पंचवार्षिक योजनेतील कामांची अंदाजपत्रके मिळाली नसल्याने प्रस्ताव सादर करता आले नसल्याचे आढावा घेताना तालुक्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यावरून सुद्धा सभापती जाधव यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
यावेळी बोलताना सभापती जाधव यांनी जिल्हा परिषदेच्या एकूण बजेटच्या २० टक्के निधी आपला समाजकल्याण विभाग खर्च करतो. यावर्षी पंचवार्षिक योजनेचा ७ कोटी निधी खर्च करायचा आहे. एकूण १० कोटी निधी खर्च करावयाचा असताना अधिकारी सहकार्य करीत नाहीत. ते सभेला उपस्थित राहत नाहीत. समिती सदस्य सुद्धा सभेला येत नाही. मग निधी खर्च होणार कसा ? प्रस्ताव मंजूर झाले नाहीतर नंतर सदस्य आपले प्रस्ताव मंजूर न झाल्याची नाराजी व्यक्त करतात. परंतु सभेलाच उपस्थित राहिले नाहीतर काय करणार ? तालुक्याच्या अधिकाऱ्यांना सुद्धा मागासवर्गीय वस्ती विकास नको आहे. त्यामुळे ते कामे करीत नाहीत, असा आरोप केला.
