शिवसैनिकावरील हल्ल्याप्रकरण; राजकीय वातावरण तापणार
*⚡कणकवली ता.२३-:* जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचार प्रमुख असलेल्या संतोष परब यांच्यावर कणकवलीत झालेल्या हल्लाप्रकरणी पोलिसांनी आम.नितेश राणे यांना चौकशी करता आर.पी.सी कलम १६० अन्वये नोटीस काढत पोलीस ठाण्यात हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
शनिवारी १८ डिसेंबर रोजी संतोष परब यांच्यावर कणकवलीत हल्ला झाला होता. यानंतर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार नितेश राणे यांच्यावर या प्रकरणी आरोप केले होते. आम.नितेश राणे यांना पोलिसांची नोटीस गुन्हयाचे तपासकामी कणकवली पोलीस ठाणे येथे हजर आ.नितेश राणे यांना कणकवली पोलीस स्टेशन , जिल्हा सिंधुदुर्ग गुन्हा रजि , क्रमांक ३८७/ २०२१ IPC कलम ३०७,३४ आपणास याव्दारे कळविण्यात येते की , फिर्यादी संतोष मनोहर परब( वय ४४ वर्षे रा . साक्षी अपार्टमेंट कनकनगर ता . कणकवली) हे त्यांचे मोटरसायकल (एम. एच. ०७. ओ . एफ . ३० ९ ८) हिरो शाईन मोटार सायकलवरुन कणकवली नरडवेनाका ते कनेडीकडे जात असताना त्यांच्या मोटरसायकलच्या पाठीमागुन येणाऱ्या नंबरप्लेट नसलेल्या इनोव्हा कारने प्रथम धडक दिली.फिर्यादी हे खाली पडले असता इनोव्हा कारमधील एका अज्ञात व्यक्तीने खाली उतरुन ” तु सतीश सावंत यांचे काम करतोस का बघतो तुला ” असे म्हणुन त्याचेकडील चाकुने फिर्यादी यांचे छातीच्या बाजुस वार करुन फिर्यादी यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला तसेच सदर इसम जाताना ” गोटया सावंत व नितेश राणे ” यांना कळवायला पाहीजे असे म्हणुन तो इनोव्हा कारमध्ये बसुन पळुन गेला म्हणुन फिर्यादी यांनी दिले. फिर्यादीवरुन वरीलप्रमाणे गुन्हा दाखल आहे . सदर गुन्हयाचा तपास आम्ही करीत आहोत . तरी सदर गुन्हयाचे अनुषंगाने आपल्याकडे तपास करावयाचा असल्याने आपण कणकवली पोलीस ठाणे येथे आमच्या समक्ष हजर रहावे,अशी नोटीस पोलीस निरीक्षक कणकवली सचिन हुंदळेकर यांनी बजावली आहे. अज्ञातांनी केला हल्ला जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे समर्थक करंजे माजी सरपंच संतोष परब यांच्यावर इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी टोकदार चाकूने वार केल्याने परब जखमी झाले होते. संतोष परब यांनी दिलेल्या माहितीनुसार हा हल्ला राजकीय वादातून केल्याचा संशय व्यक्त केला आहे. दरम्यान जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी तातडीने उपजिल्हा रुग्णालयात धाव घेत जिल्हा बँक इलेक्शन सुरू असतानाच झालेल्या या हल्ल्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली होती. संतोष परब हे मोटरसायकल वरून कनकनगर येथे जात असताना मागून येणाऱ्या नंबर प्लेट नसलेल्या इनोव्हा कारने परब यांच्या मोटरसायकलला डॉ. नागवेकर यांच्या एम. आर. आय. सेंटर नजीक मागून धडक दिली. धडकेनंतर परब रस्त्यावर पडल्यानंतर इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी परब यांच्यावर चाकू सदृश्य टोकदार हत्याराने छातीवर वार केले. या हल्ल्यात परब जखमी झाले असून त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले. हल्ल्याचे सूत्रधार आमदार नितेश राणे, गोट्या सावंत आहेत असा सतीश सावंत यांचा आरोप होता.जिल्हा बँक निवडणुकीतील माझे प्रचारप्रमुख संतोष परब यांच्यावर झालेला प्राणघातक हल्ला हा आमदार नितेश राणे, माजी जि. प. अध्यक्ष गोट्या सावंत यांच्या भाडोत्री गुंडांनी केल्याचे सांगत या हल्ल्याचे सूत्रधार आमदार नितेश राणे, गोट्या सावंत असल्याचा आरोप शिवसेनेचे जिल्हा बँक निवडणूक पॅनेल प्रमुख सतीश सावंत यांनी केला होता. जिल्हा बँक निवडणुक दहशतवादाने जिंकण्याचा राणेंचा डाव आहे. २०१५ साली राणेंची साथ सोडणाऱ्या राजन तेलींवर अशाच प्रकारे सावंतवाडी रेस्ट हाऊसमध्ये हल्ला झाला होता. सहकार क्षेत्रात खुनी हल्ले करून दशतवादाने जिल्हा बँक ताब्यात घेण्याचा राणेंचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. जिल्ह्यातील जनता राणेंच्या या दहशतवादाला चोख प्रत्युत्तर देईल, असे सावंत म्हणाले होते. जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी जिल्हा बँकेत चांगले काम केले असून जिल्हा बँकेत पराभावाच्या भीतीने नितेश राणेंच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. संतोष परब यांच्यावर हल्ला करून जिल्हा बँक सारख्या सहकार निवडणुकीत राणे दहशत निर्माण करत आहेत. मात्र या दहशतीला शिवसेना चोख प्रत्युत्तर देईल, असा इशारा शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी दिला होता. या सर्व पार्श्वभूमीवर आमदार नितेश राणे यांना पोलिसांनी चौकशीची नोटीस बजावल्याने खळबळ उडाली आहे .सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक 30 डिसेंबर रोजी होत असून यादरम्यान या प्रकरणाला कलाटणी मिळाली असल्याने नेमके यातून काय उघड होते याची उत्सुकता लागली आहे.
