आठव्या ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कवी अजय कांडर

डॉ.राजेंद्र पाटील वड्रावकर यांच्या हस्ते उदघाटन;26 रोजी शिरढोण-कोल्हापूर येथे आयोजन

*⚡कणकवली ता.२२-:* कोल्हापुर-शिरढोण येथे रविवार 26 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या आठव्या ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध कवी आणि स्तंभलेखक अजय कांडर यांची निवड करण्यात आली आहे. तर राज्याचे आरोग्य राज्यमंत्री डॉ राजेंद्र पाटील वड्रावकर यांच्या हस्ते संमेलनाचे उदघाटन करण्यात येणार असल्याची माहिती संमेलन संयोजन समितीचे अध्यक्ष दिलीप कोळी यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना दिली.

शिरढोण साहित्य परिषदेतर्फे या आठव्या ग्रामीण साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून मराठीतील विविध मान्यवर साहित्यिकां या संमेलनासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. शिरढोण सारख्या निमशहरी भागात साहित्यिक वातावरण निर्माण व्हावे इतर लेखनाबरोबर कवितेची चळवळ रुजावी या हेतूने यावर्षीच्या या संमेलनाच्या अध्यक्षपदी मराठीतील एका नामवंत कवींची निवड करावी असा निर्णय संमेलन संयोजन समितीतर्फे घेण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर मराठीतील आजच्या पिढीतील महत्त्वाचे कवी असलेल्या अजय कांडर यांची संमेलनाध्यक्षपदी निवड करण्यात आली असल्याचेही श्री कोळी यांनी सांगितले.

ग्रंथदिंडीने सुरुवात होणाऱ्या या संमेलनात उद्घाटन सत्राबरोबरच व्याख्यान पुरस्कार वितरण आणि राज्यभरातील निमंत्रित कवींचे कविसंमेलन आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कवी अजय कांडर यांची अलीकडेच इचलकरंजी येथे आयोजित केल्या गेलेल्या संस्कृती साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. कांडर हे मराठीतील आजचे आघाडीचे कवी असून त्यांचे ‘आवानओल’ ‘हत्ती इलो’ आणि ‘युगानुयुगे तूच’ हे तीन कवितासंग्रह बहुचर्चित ठरले आहेत.अमेरिकेतून दिला जाणाऱ्या महाराष्ट्र फाउंडेशनसह अत्यंत प्रतिष्ठित अशा जैन उद्योग समुहाच्या बालकवी पुरस्कारानेही त्यांना गौरविण्यात आले आहे. कांडर यांच्या कविता हिंदी, इंग्रजी, मल्याळम, उर्दू आदी भारतीय भाषांमध्ये भाषांतरित झाल्या असून महाराष्ट्रातल्या आठ विद्यापीठात आणि एका शालेय अभ्यासक्रमात त्यांच्या कवितांचा समावेश करण्यात आला आहे. देशभरातील विविध बहुभाषिक कविसंमेलन आणि अखिल भारतीय साहित्य संमेलनात त्यांना अनेक वेळा कविता वाचनासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.भारत सरकारच्या साहित्य अकादमीवर कांडर यांची 2013 ते 2018 या कालावधीत सल्लागार सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. तसेच 2004 साली त्यांना साहित्य अकादमीची प्रवास फेलोशिप प्राप्त झाली होती. प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे निर्मित राजू मुळे दिग्दर्शित ‘बैल- अबोलबाला’ या गाजलेल्या नाटकात त्यांच्या काही कवितांचा समावेश करण्यात आला आहे. तर महाश्वेता देवी या जागतिक कीर्तीच्या लेखिकेच्या कथेवर संदेश भंडारे दिग्दर्शित ‘महादू’ या चित्रपटाची त्याने लिहिलेली गाणी लक्षवेधी ठरली असून त्यांचे चित्रपट गीतलेखन सुरेश वाडकर, देवकी पंडित, शौनक अभिषेकी, शाहीर संभाजी भगत यांनी गायली आहेत.

You cannot copy content of this page