संन्मित्र रिक्षा संघटना नांदगाव यांची मागणी;२३ डिसेंबरपर्यत कारवाई न केल्यास आंदोलन
कणकवली 15 डिसेंबर (प्रतिनिधी)- कोरोना महामारीत रिक्षा व्यवसाय डबघाईला आहे.रिक्षा मालक व चालकांवर उपासमारीची वेळ गेल्या दोन वर्षात आली आहे . त्यातच नांदगांव रिक्षा स्टँड वरुन सहा सीटर रिक्षा व्यावसायिक लगतच्या गावांमधील प्रवासी घेवुन आमचा व्यवसाय बुडवत आहेत . सरसकट प्रवासी भरणाऱ्या सहा सीटर रिक्षाचालकांवर कारवाई करावी,अशी मागणी आरटीओ,पोलीस निरीक्षक यांच्याकडे संन्मित्र रिक्षा संघटना नांदगाव यांनी केली आहे,अन्यथा २३ डिसेंबरननंतर कोणत्याही क्षणी आंदोलन झेडण्याचा इशारा दिला आहे. कणकवली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. शिंदे,पोलीस कॉन्स्टेबल श्री.साबळे यांना संन्मित्र रिक्षा संघटना नांदगावच्यावतीने निवेदन देण्यात आले. यावेळी अध्यक्ष विलास कांडर, भाऊ काझी,अनिल गुरव यांच्यासह तीन चाकी रिक्षा चालक उपस्थित होते. पूर्वी अनेक वर्षापासून तीन चाकी व सहा सीटर चालकांच्या समन्वयातून कणकवली रुटवर जाणारे सहा सीटर धारक बेळणे गाव पुढील व देवगड रुटवर जाणारे शिरगाव पुढील प्रवासी घेण्याचे ठरले आहे . आता सरसकट प्रवासी भरुन आम्हा तीन चाकी रिक्षा चालकांवर अन्याय केला जात आहे . तरी येत्या २३ डिसेंबर २०२१ पर्यंत आपण त्यांना समज देत पर्यायी मार्ग काढण्यात यावा, अन्यथा नाईलाजास्तव तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,असा इशारा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री.काळे, सिंधुदुर्ग व कणकवली पोलीस निरीक्षक यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
