ग्रामस्थांची ज़िल्हाधिकाऱ्यांकडे मागणी;चार दिवसात कार्यवाही न झाल्यास ‘रास्तारोको’चा इशारा
मालवण दि प्रतिनिधी मालवण तालुक्यातील ओवळीये धनगरवाडी ते हेदुळ मुख्य रस्त्यावर चिरेखाण व्यवसायिकांनी चिरेखाण व्यवसायासाठी केलेले अतिक्रमण चार दिवसात हटवून रस्ता पूर्ववत करावा. अन्यथा रास्तारोको करून उपोषण छेडले जाईल. असा इशारा ओवळीये धनगरवाडी ग्रामस्थ व लोकप्रतिनिधी यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे. दरम्यान, जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनीही ग्रामस्थ व लोकप्रतिनिधी यांच्याशी चर्चा करत वस्तुस्थिती जाणून घेतली. मालवण पंचायत समिती सभेत याप्रश्नी आवाज उठवणारे गटनेते सुनील घाडीगांवकर व जिप वित्त व बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण व अन्य स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी जिप अध्यक्ष यांना सविस्तरपणे माहिती दिली. त्यांनंतर स्थानिक आमदार वैभव नाईक यांचेही ग्रामस्थांनी लक्ष वेधले. जि प अध्यक्षा संजना सावंत यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थ व लोकप्रतिनिधी यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी याप्रश्नी चर्चा करत निवेदन दिले. यावेळी वित्त व बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण, मालवण पंचायत समिती गटनेते सुनील घाडीगांवकर यांच्यासह हेदुळ सरपंच नंदादीपक गावडे, ओवळीये सरपंच अंबाजी सावंत, उपसरपंच सत्याविजय गावकर, माजी उपसरपंच समीर सावंत, नंदकुमार आंगणे व अन्य उपस्थित होते. ग्रामस्थानी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. ओवळीये धनगरवाडी वस्ती येथे जवळपास २०० ते २५० लोकवस्ती असून, ओवळीये धनगरवाडी येथे हेदूळ मुख्य रस्त्यापासून रहदारीसाठी रस्ता जोडलेला आहे. सदर रस्त्यावर जवळपास २० वर्ष पूर्वी पासून रहदारी दळणवळण चालू आहे. गेले दोन दिवसापासून साटम व पालकर नामक या दोन चिरेखाण मालकांनी सदर रस्त्यावर अतिक्रमण करुन आमच्या धनगरवाडी कडे जाणा-या रस्त्यावर मधोमध चिरेखाण व्यवसाय सुरु केला आहे. त्यामुळे आम्हाला फार मोठया प्रमाणात गैरसोयीला सामोर जावे लागत आहे. दळणवळण बंद झाले आहे. आमच्या धनगरवस्तीला जोडणारा हा एकमेव रस्ता असल्याने गरोदर महिला किंवा आजारी रुग्णांस दवाखान्यात नेणे किंवा इतर वैदयकिय उपचारासाठी, अन्य वाहतूक करणे कठिण झालेले आहे. सदर रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम उपविभाग मालवण यांचकडून सन २०११-१२ मध्ये लेखाशिर्ष – ५०५४ रस्ते व पूल विकास डीपीडीसी अंतर्गत रु ७ लाख ९६ हजार २१६ एवढा खर्च झालेला असून, सदर कामावेळी रस्त्याच्या काही भागामध्ये खडीकरण, काही भागामध्ये खडी-डांबरीकरण तसेच मो-यांचे बांधकाम झालेले आहे. तरी रस्त्यांवरील चिरेखाण व्यवसायासाठी केलेले अतिक्रमण चार दिवसात हटवून रस्ता आम्हांस पूर्ववत सुरु करून योग्य तो न्याय द्यावा. योग्य ती कारवाई न झाल्यास रास्ता रोको करून उपोषण आंदोलन छेडले जाईल. असा इशारा ग्रामस्थ लोकप्रतिनिधी यांनी दिला आहे.
