मुलगा गंभीर जखमी:
मालवण दि प्रतिनिधी मालवणहून गोव्याच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या गोवा येथील पर्यटकांच्या लक्झरी ट्रॅव्हल गाडीने रस्ता ओलांडणाऱ्या शाळकरी मुलाला जोरदार धडक दिल्याने निनाद नारायण मांडलकर (वय १२, रा. गोड्याचीवाडी) हा मुलगा गंभीररीत्या जखमी झाल्याची घटना आज सायंकाळी चौके गोड्याचीवाडी येथे घडली दरम्यान, जखमी निनाद मांडलकर या मुलाच्या दोन्ही पायांना जबर दुखापत झाल्याने त्याला प्रथम कुडाळ व त्यानंतर पडवे येथे रुग्णालयात अधिक उपचारासाठी हलविण्यात आले आहे दरम्यान, मुलाला धडक देऊन पळून जाण्याच्या बेतात असणाऱ्या गोवा येथील लक्झरी ट्रॅव्हलला रस्त्यात डंपर आडवा उभा करून ग्रामस्थांकडून अडवून ठेवण्यात आल्याने या ट्रॅव्हल चालकास पळ काढणे मुश्किल झाले. तर ग्रामस्थानी त्या चालकास चांगलाच प्रसाद दिल्याचे वृत्त आहे. याबाबत मिळलेल्या माहितीनुसार चौके गोड्याची वाडी येथे राहणारा निनाद नारायण मांडलकर हा मुलगा काळसे येथील शिवाजी विद्यामंदिर मध्ये इयत्ता सहावी मध्ये शिक्षण घेतो. सध्या एसटी बस बंद असल्याने आज सायंकाळी शाळा सुटल्यावर निनाद याने घरी जाण्यासाठी एका डंपर मधून प्रवास करत चौके- कुडाळ मार्गावरील गोड्याची वाडी येथे उतरला. डंपर मधून उतरून रस्ता ओलांडत असताना याच मार्गावरून गोव्याच्या दिशेने पर्यटकांनी भरलेल्या गोवा येथील लक्झरी (क्र. जीए – ०३- डब्ल्यू- ९८१०) ट्रॅव्हलने निनाद याला जोरदार धडक दिली. या धडकेत निनाद हा रस्त्याच्या कडेला फेकला जाऊन त्याच्या दोन्ही पायांना जबर दुखापत होऊन तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. मुलाला धडक बसल्याने भयभीत झालेला लक्झरीचा चालक लक्झरीने पळ काढण्याच्या बेतात होता. मात्र याच मार्गावरून मालवणच्या दिशेने जाणाऱ्या अक्षय हळदणकर याने तेथून जाणारा एक डंपर रस्त्यात आडवा उभा करण्यास सांगून लक्झरीला अडवून ठेवले. धडक देऊनही माणुसकी न दाखवता पळून जाण्याचा प्रयत्न केल्याने ट्रॅव्हल चालक हरी मातृ करंगुटकर (रा. म्हापसा गोवा) याला संतप्त झालेल्या स्थानिक ग्रामस्थानी त्याला प्रसाद ही दिला. यावेळी स्थानिक ग्रामस्थानी रक्तबंबाळ झालेल्या निनाद याला खासगी गाडीने कुडाळ व नंतर पडवे येथे रुग्णालयात उपचारासाठी हलविले. अपघात स्थळी पोलीस योगेश सराफदार, संतोष फुटवाड हे दाखल झाले. यावेळी स्थानिक ग्रामस्थानी ट्रॅव्हल चालक हरी मातृ करंगुटकर (रा. म्हापसा गोवा) याला पोलिसांच्या ताब्यात दिले. याबाबत पोलिसांकडून पुढील तपास व कार्यवाही सुरू होती. रात्री उशिरापर्यंत याबाबत पोलिसात नोंद नव्हती
