सिद्धिविनायक सावंतवाडी संघाने पटकाविला उपसरपंच चषक २०२१

शिरगांव प्रीमियर लीग: सरफरे मित्र मंडळ संघास उपविजेतेपद

*⚡देवगड ता.०७-:* वातावरणातील बोचरी गुलाबी थंडी, डीजे चा थरार, क्रीडा रसिकांचा जल्लोष, धावांची बरसात, एवढ्यात ताकदीची गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण, दमदार धावते समालोचन, पारितोषिकांची बरसात, उत्कृष्ट नियोजन आणि फटाक्यांची आतिषबाजी अशा जल्लोषपूर्ण वातावरणात तरुणाईच्या उपस्थित देवगड तालुक्यातील शिरगांव येथे तालुक्यातील पहिली वहिली शिरगाव प्रीमियर लीगचे ३ ते ५ डिसेंबर या कालावधीत आयोजन करण्यात आले होते. देवगड तालुक्यात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या शिरगांव प्रीमियर लीग मधील चुरशीच्या अंतिम लढतीत सिद्धिविनायक सावंतवाडी संघाने रोमहर्षक विजय मिळवत मानाच्या उपसरपंच चषक २०२१ पटकाविला. शिरगांव बाजारपेठ येथील ओमगणेश क्रीडांगणावर ३ ते ५ डिसेंबर या कालावधीत एस.व्ही.स्पोर्ट, अमित साटम मित्र मंडळ व सोनू मोंडकर मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शिरगांव प्रीमियर लीग उपसरपंच चषक २०२१ या प्रकाश झोतातील बॉक्सटाईप मर्यादित षटकांच्या क्रिकेट स्पर्धा पार पडल्या. अंतिम सामना सिद्धिविनायक सावंतवाडी आणि सरफरे मित्र मंडळ या संघात झाला. सिद्धिविनायक सावंतवाडी संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले. प्रथम फलंदाजी करताना सरफरे मित्र मंडळ संघाने मर्यादित षटकात सर्वबाद ३५ धावा केल्या प्रत्युत्तरादाखल या आव्हानाचा पाठलाग करताना शेवटच्या चेंडूपर्यंत रोमहर्षक स्थितीत कडवी झुंज देत सिद्धिविनायक सावंतवाडी संघाने विजयश्री खेचून आणली व मानाच्या उपसरपंच चषकावर आपले नांव कोरले. अंतिम विजेत्या सिद्धिविनायक सावंतवाडी संघास १००००/- रुपये व चषक तर उपविजेत्या सरफरे मित्र मंडळ संघास ५०००/- रुपये व चषक, तृतीय एस. बी. स्पोर्ट देवगड संघास ३०००/-रुपये व चषक, चतुर्थ स्वामी समर्थ आंबेखोल संघास २०००/- रुपये व चषक वैयक्तिक पारितोषीकांत उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आकाश साटम, गोलंदाज प्रकाश चव्हाण, फलंदाज गुरूप्रसाद मलये, मालिकावीर भूषण गावडे यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. पारितोषिक समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना शिरगांव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी प्राचार्य विजयकुमार कदम म्हणाले की,आर के साटम हे माणूसपण जपणारं, अडचणीच्या वेळी ग्रामस्थांच्या मदतीला धावून जाणारे,समाजाला दिशादर्शक, दातृत्वाचा वारसा जपणारे प्रेरणादायी व्यक्तिमत्व होतं. त्यांच्या नांवाने स्थापन होणाऱ्या आर. के. फाऊंडेशनच्या माध्यमातून समाजोपयोगी उपक्रमात युवकांनी सहभागी व्हावे. त्यांचा वारसा विद्यमान उपसरपंच अमित साटम, विशाल साटम आणि त्यांच्या कुटुंबीयांनी पुढे चालवावा. पारितोषिक वितरण समारंभास शिरगांव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी प्राचार्य विजयकुमार कदम, उपसरपंच अमित साटम, माजी सभापती सदानंद देसाई, सामाजिक कार्यकर्ते संदीप साटम,भाई आईर, हेमंत देसाई, शरद साटम, गणेश पवार, पुरुषोत्तम साटम, विवेक चव्हाण, विशाल साटम, मंगेश लोके, सर्वोत्तम साटम, युधिराज राणे, विशाल कुवळेकर, विनोद सरफरे, दत्ताराम मगम, सोनू मोंडकर, आदींसह क्रीडा रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page