संवादाच्या खिडकीद्वारे मानवी भावभावनांची कवाडे अभिनेते प्रदीप कबरे यांनी उलघडली

मधुसूदन नानिवडेकर यांच्या नावाने “मधु कट्टा” उभारण्याचा संकल्प

*⚡कणकवली ता.०७-:* प्रत्येकामध्ये लेखक,कवी दडलेला असतो.त्यासाठी समाजात चांगल्या वाईट गोष्टी शोधता आल्या पाहिजेत. नेहमीच सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन मनाची खिडकी उघडी ठेवली पाहिजे.जमवलेल्या माणसांपेक्षा जमलेली माणसे ही अधिक मौल्यवान असतात कारण त्यांच्यात आत्मियता ठासून भरलेली असते असे प्रतिपादन लेखक ,कवी ,नाट्यसीने अभिनेते म्हणून सुपरिचित असलेले आघाडीचे कलाकार प्रदीप कबरे यांनी व्यक्त केले. तळेरे येथील “संवाद परिवाराच्या”वतीने आयोजित करण्यात आलेल्या “खिडकी” या कार्यक्रमाच्या वेळी मानवी भावभावनांचे अनेक पैलू रसिकांसमोर अलगदपणे उलगडत गेले. याप्रसंगी ते म्हणाले, रजनी जोशी, जगन्नाथ कांदळगावकर आदी दिग्गज व्यक्तीबरोबर काम करण्याची संधी उपलब्ध झाली. तर बिनाका गीतमालाची पत्रे साॅर्टआउट करून अमीन सयानी यांना देत असे. जवळ जवळ २००० कमर्शियल ध्वनिमुद्रितचे लेखन केले असून खऱ्या अर्थाने “खिडकी” द्वारे लेखनास सुरुवात झाली यातील बऱ्याच खिडक्या श. ना. नवरे यांच्या नजरेखालून गेलेल्या असून १२ खिडक्या लिहून झाल्यानंतर त्यांचे दुःखद निधन झाले.गंगाराम गवाणकर यांनी मात्र नंतरच्या खिडक्यांना प्रस्तावना दिली सध्या मालवण मध्ये २५ वा कार्यक्रम सादर केल्यानंतर २६ वा कार्यक्रम तळेरे येथे डॉ.मिलिंद कुलकर्णी यांच्या प्रांगणात सादर करण्याची संधी मिळाली. कॉंक्रिटच्या रस्त्यापासून सुरू झालेला “खिडकीचा प्रवास” सिग्नल ,काहीही न ठरवता ,श्रावण बाप ,व्हॅलेंटाईन डे ,डीमाॅलिशन, पोस्टर, भिक , भेटीची अशीही ओढ असे करत शेवटची खिडकी ‘झेंड्या’जवळ कधी पोहोचली हे रसिकांना कळलेच नाही.ज्या सत्य घटना खिडकीतून पाहिल्या त्या सुंदररीत्या शब्दबध्द करुन सादर केल्या.तेवढीच रसिकांनी टाळ्यांनी दाद दिली.मध्यंतरी सादर केलेल्या “शब्द “या कवितेने तर एक वेगळाच शब्द भाव रसिक मनावर उमटवला. रात्री ८ नंतर बोचऱ्या थंडीतही खिडकीची किमया अनुभवण्यास आलेले रसिक प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले होते.किंबहुना प्रदीप कबरे यांच्या भारदस्त आवाजाने ते भारावूनच गेले होते. तत्पूर्वी तळेरे येथील आदर्श व्यापारी संघटनेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राजू जठार यांचा प्रदीप कबरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच वैभववाडीचे गटविकास अधिकारी जयप्रकाश परब,नाट्य लेखक,कवी व कलाकार संतोष टक्के , प्रा.संजीवनी पाटील, दादासाहेब महाडिक , राजेश माळवदे ,सचिन पावसकर , निकेत पावसकर यांनाही प्रदीप कबरे लिखित पुस्तक देऊन गौरवण्यात आले. तर दादासाहेब महाडिक आणि डॉ.सुखानंद भागवत यांच्या हस्ते प्रदीप कबरे यांना शाल, श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.युवा चित्रकार अक्षय मेस्त्री याने प्रदीप कबरे यांचा आपल्या चित्रकलेतून रेखाटलेला फोटो त्यांना प्रदान केला.संवाद परिवारातील सदस्य दिवंगत नामवंत कवी,गझलकार,जेष्ठ पत्रकार मधुसूदन नानिवडेकर यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.तसेच नेहमीच्या कार्यक्रमस्थळी त्यांच्या नावाने “मधु कट्टा” बांधला जाणार असल्याची संकल्पना डॉ.मिलिंद कुलकर्णी यांनी यावेळी जाहीर केली.संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मिलिंद कुलकर्णी यांनी मानले.

You cannot copy content of this page