मळेवाड भटवाडी येथे आमदार दीपक केसरकर यांनी दिली भेट

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत अर्धवट असलेल्या कामांची केली पाहणी;अर्धवट असलेले काम तात्काळ सुरू करण्याचे दिले आदेश

*⚡सावंतवाडी ता.०७-:* मळेवाड भटवाडी येथे माजी पालकमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी भेट देत मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत अर्धवट असलेल्या कामांची पाहणी करत अर्धवट असलेले काम तात्काळ सुरू करण्याचे आदेश संबंधित ठेकेदाराला दिले.

मळेवाड भटवाडी ते शिरसाटवाडी येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत रस्त्याचे व पुलाचे काम मंजूर झाले होते. मात्र कामाचा कालावधी होऊन सुद्धा हे काम अद्यापही अपूर्णावस्थेत आहे. मात्र याकडे संबंधित खाते, ठेकेदाराचे पूर्णतः दुर्लक्ष होत आहे.

याचा नाहक त्रास येथील ग्रामस्थ, पादचारी, वाहन चालकांना बसत आहे. वेळोवेळी या कामाबाबत आवाज उठवूनही याची दखल घेतली जात नसल्याने ही बाब माजी पालकमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांना प्रकाश पार्सेकर यांनी निदर्शनास आणून देताच तत्काळ याची दखल घेत आमदार दीपक केसरकर यांनी या अर्धवट असलेल्या कामाची पाहणी करून संबंधित ठेकेदाराला येत्या आठ दिवसांत काम पूर्ण करण्याचा आदेश दिला. यावेळी ठेकेदाराने लवकरात लवकर काम पूर्ण करण्याची ग्वाही केसरकर यांना दिली.

यावेळी उपजिल्हाप्रमुख अशोक दळवी, युवासेना तालुका अधिकारी योगेश नाईक, ग्रामपंचायत सदस्य प्रसाद नाईक, प्रकाश पार्सेकर, भाई रेडकर, सुनील तिरोडकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page