प्रा. रुपेश पाटील;पणजी-गोवा येथे आयोजित व्याख्यानात केले मार्गदर्शन
*⚡सावंतवाडी ता.०६-:* प्रत्येक शतकी कालखंडामध्ये एखादा युगपुरुष जन्माला येतो आणि आपल्या कार्यकर्तृत्वाने तो समाजाला वेगळी उंची प्राप्त करून देतो. छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजी, लोकराजा शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्मा फुले अशा युगपुरुषांच्या बरोबरीनेच सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने संपूर्ण समाजाची आणि किंबहुना देशाची रचना बदलणारे थोर समाज क्रांतिकारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे विकारांच्या दऱ्या लाथाडून विचारांचे वटवृक्ष निर्माण करणारे एक महान युगपुरुष होते, असे प्रतिपादन ‘शिव-फुले- शाहू-आंबेडकरी’ व्याख्याते प्रा. रुपेश पाटील यांनी पणजी येथे व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विश्वभुषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर समिती, गोवा राज्य आणि समाजकल्याण खाते, गोवा सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने पणजी (गोवा) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे बाबासाहेबांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भावपूर्ण आदरांजली व प्रबोधनात्मक व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रा.रुपेश पाटील यांचे बाबासाहेबांच्या जीवनावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून समाज कल्याण खाते गोव्याचे राज्य संचालक विनेश आर्लेकर, विश्वभुषण समिती गोवा राज्याचे अध्यक्ष सखाराम कोरगावकर तसेच आर.पी.आय.आठवले गटाचे गोवा राज्य अध्यक्ष सतीश कोरगावकर, भारतीय बौद्ध महासभा, गोवा राज्याचे अध्यक्ष एस.के.जाधव, सिंधुदुर्ग बौद्ध हितवर्धक महासंघ, गोवा राज्याचे अध्यक्ष तुकाराम तांबोसकर, धम्मचारी ज्ञानदर्शी, त्रिरत्न बौद्ध महासंघ गोवाचे डॉ.महेश पेडणेकर, सावित्रीबाई फुले महिला मंडळ, गोवा राज्याच्या अध्यक्षा प्रमिला प्रजाक्ते, विश्वभूषण समितीचे सचिव अशोक खाजनेकर, खजिनदार अशोक पवार, सामाजिक कार्यकर्ते हरिश्चंद्र जाधव, संजय पवार आदी उपस्थित होते. प्रारंभी प्रमुख अतिथींच्या हस्ते विश्वभुषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर गौतम बुद्ध, महात्मा फुले व बाबासाहेबांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. प्रा.रुपेश पाटील यांनी यावेळी “बाबासाहेब आणि सामाजिक क्रांती’ या विषयावर व्याख्यान गुंफले. आपल्या अभ्यासपूर्ण व्याख्यानातून प्रा. रुपेश पाटील यांनी बाबासाहेब आंबेडकरांचे अनेक पैलू उपस्थितांना सांगितले. यावेळी प्रा.पाटील म्हणाले की, बाबासाहेब म्हणजे केवळ घटनाकार नाहीत, तर ते बुद्धिमत्तेचे विलक्षण तेज असतानाही अंगी प्रचंड नम्रता, स्वाभिमान व प्रामाणिकपणा असे त्रिवेणी संगम असणारे एक महान व्यक्तिमत्व होते. सलग अठरा-अठरा तास वाचन करून बाबासाहेबांनी आपल्या अंगी अभ्यासूवृत्ती जोपासली आणि त्याच अनुषंगाने लंडन सारख्या शहरात जाऊन ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही मानाची पदवी मिळवली. बाबासाहेब म्हणजे दूरदृष्टीचे अर्थतज्ञ होते.
लंडनच्या ‘स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’ मध्ये बाबासाहेबांनी लिहिलेला ‘प्रॉब्लेम ऑफ रुपी’ हा ग्रंथ आजही भल्या भल्या अर्थशास्त्रज्ञांना अभ्यासावा लागतो. बाबासाहेब थोर जलतज्ञ होते, विधी विशारद होते, आणि प्रबोधन करणाऱ्या जाणिवांचा लेखकही होते. एवढेच नव्हे तर बाबासाहेब हे शेतकऱ्यांचे कैवारी सुद्धा होते. आणि म्हणूनच १९४४ मध्ये ‘दामोदर नदी प्रकल्पाला’ बाबासाहेबांनी मान्यता दिली होती, असेही प्रा.पाटील यांनी आपल्या व्याख्यानात नमूद केले. कार्यक्रमास उपस्थित गोवा राज्याचे समाज कल्याण विभागाचे संचालक विनेश कार्लेकर, तसेच सखाराम कोरगावकर, एस.के.जाधव, रिपब्लिकन पार्टी ऑफ गोवाचे ( आठवले गट) अध्यक्ष सतीश कोरगावकर, तुकाराम तांबोसकर, डॉ. महेश पेडणेकर, प्रमिला प्रजाक्ते आदींनी मनोगते व्यक्त केली कार्यक्रमाचे प्रास्ताविक विश्वभुषण समितीचे अध्यक्ष सखाराम कोरगावकर यांनी केले. सूत्रसंचालन अशोक परवार यांनी तर आभार प्रदर्शन अशोक खाजनेकर यांनी केले.
