कुडाळ नगरपंचायतीसाठी इच्छुकांची भाऊगर्दी

पक्षांमध्ये वाढतेय अंतर्गत स्पर्धा;बंडखोरी टाळण्यासाठी करावी लागणार कसरत

*⚡कुडाळ ता.०६-:* ज़िल्ह्यात सर्वाधिक लक्षवेधी ठरणाऱ्या कुडाळ नगरपंचायतीची निवडणूक जवळ येत आहे तसतसा राजकीय घडामोडीना वेग येत आहे. सर्वच पक्षांमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी झाल्याने अंतर्गत स्पर्धा वाढली आहे. त्यातच पक्षांनी उमेदवारीबाबत गुप्तता पाळल्याने इच्छुकांची धाकधूक वाढली असून याचा परिणाम बंडखोरीमध्येही होण्याची भीती निर्माण झाली आहे. बंडखोरीची लागण टाळण्यासाठी सर्वच पक्षांना कसरत करावी लागणार आहे.

कुडाळ नगर पंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शनिवारी चौथा दिवस होता परंतु सायंकाळपर्यंत एकाही प्रमुख राजकीय पक्षाने अधिकृत उमेदवारांच्या नावाची घोषणा केली नाही. उमेदवारीचा सस्पेन्स ठेवल्याने इच्छुकांमध्ये कमालीची धाकधुकता वाढली आहे. सोमवार आणि मंगळवार हे शेवटचे उमेदवारी अर्ज भरण्याची दोन दिवस असल्याने या दिवशी सर्वच पक्ष आपले उमेदवार जाहीर करतील.

कुडाळ नगरपंचायती साठी शिवसेना आणि राष्ट्रवादी अशी युती झाली आहे. काँग्रेस आणि भाजप स्वबळावर लढणार आहेत. तसेच सर्वच पक्षांनी निवडणुकीची व्युहरचना आखलीआहे. त्याप्रमाणे सर्वच पक्षांनी प्रभागनिहाय प्रबळ उमेदवाराचा शोध घेत इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्याचा सोपस्कार पार पडला आहे. शिवसेना व भाजप या दोन्ही पक्षात इच्छुकांची मोठी भाऊगर्दी झाली आहे. प्रत्येक प्रभागात इच्छुकांची संख्या वाढली आहे. त्या त्या पक्षातील सर्वच प्रमुख कार्यकर्त्यांनी उमेदवारीची मागणी केल्याने पक्षश्रेष्ठींनी पुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. जवळपास सर्वच पक्षांनी आपल्या अधिकृत उमेदवारांची यादी तयार केली आहे. 1 डिसेंबर पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. शनिवारी उमेदवारी भरण्याचा चौथा दिवस होता मात्र इच्छुक उमेदवारांची संख्या अधिक असल्याने बंडखोरी टाळण्यासाठी सर्वच पक्षांनी उमेदवारी घोषणेचा सस्पेन्स कायम ठेवला आहे.

कागदपत्रांसाठी इच्छुकांची धावपळ

उमेदवारी दाखल करण्याकरता लागणाऱ्या कागदपत्रांची जुळवाजुळव केली जात आहे. नगरपंचायतीच्या १७ जागांपैकी आरक्षित जागेतून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र देणे अनिवार्य आहे. त्यामुळे उमेदवार त्यादृष्टीने जोरदार हालचाली करत आहेत. लागणाऱ्या कागदपत्रांची माहिती इच्छुक उमेदवारांना बैठक घेऊन देण्यात आली आहे. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येत आघाडी करुन निवडणूक लढवत आहेत. भाजपला बाजूला करण्यासाठी कंबर कसली आहे. तर भाजप सत्यता राखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करणार आहे. कॉंग्रेस स्वतंत्रपणे लढत आहे. याचा फायदा भाजप कितीपत उठवणे हे पहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे. कॉंग्रेसच्या या पवित्र्यामुळे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस ची आघाडीत चिंता निर्माण झाली आहे. आज आणि उद्या सर्व चित्र स्पष्ट होणार आहे.

You cannot copy content of this page