रस्त्यात सापडलेला सॅमसंग कंपनीचा मोबाईल मूळ मालकास केला परत
*⚡सावंतवाडी ता.०२-: मळगाव बॉक्सवेल जवळ रस्त्यात पडलेला सॅमसंग कंपनीचा मोबाईल मळेवाड येथील सिद्धेश राऊत यांनी मूळ मालकास परत करत आपला प्रामाणिकपणा जपला. मळगाव येथील संबंधित व्यक्तीचा १८ हजार रुपये किंमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल तीन दिवसांपूर्वी मळगाव बॉक्सवेल जवळ रस्त्यावर पडला होता.
दरम्यान काल (बुधवारी) मळेवाड येथील सिद्धेश राऊत सावंतवाडीहून आपल्या घरी जात असताना त्यांच्या नजरेस हा मोबाईल रस्त्यावर पडलेला दिसून आला. मोबाईल बंद असल्याने त्यांनी घरी जाऊन मोबाईल सुरू करून मोबाईलवरील नंबरशी संपर्क साधून मोबाईल मूळ मालकास परत केला. त्यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल मोबाईल मालकाने त्यांचे आभार व्यक्त केले. या अगोदरही राऊत यांनी अशाच प्रकारे सापडलेले मोबाईल संबंधित मालकास परत करत आपला प्रामाणिकपणा जपला आहे. त्यांच्या या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
