अन्यथा रास्ता रोको आंदोलन करणार; अक्षता डाफळे, अरविंद रावराणे यांचा तहसीलदारांना इशारा
वैभववाडी प्रतिनिधी करूळ घाट मार्ग निर्धोक करण्याचे आश्वासन संबंधित विभागाने दिले मात्र घाटाची परिस्थिती अजूनही जैसे- थे आहे. कामात चालढकल करणाऱ्या संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करा. या मागणीसाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांसमवेत घाट मार्गात रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा सभापती सौ. अक्षता डाफळे, उपसभापती अरविंद रावराणे यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी तहसीलदार रामदास झळके यांच्याकडे सादर केले आहे. राष्ट्रीय महामार्ग विभाग यांच्यासमवेत अनेक बैठका यापूर्वी पार पडल्या आहेत. 16 नोव्हेंबर रोजी झालेल्या बैठकीत 30 नोव्हेंबर पर्यंत रस्ता पूर्ण निर्धोक करतो असे आश्वासन उपअभियंता यांनी दिले होते. मात्र काम अजूनही अपुरे आहे. घाटातील खड्डे जैसे थे आहे. घाटाची परिस्थिती दयनीय झाली आहे. रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. जीव मुठीत घेउन वाहन चालक वाहने चालवत आहेत. अवजड वाहने घाटामध्ये बंद पडत आहेत. ऊस उत्पादक शेतकरी सध्या चिंतेत आहेत. कारखान्याकडे ऊस नेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. कारखान्याकडे ऊस पोहोचला नाही तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे. वर्षभरातील मेहनत शेतकऱ्यांची वाया जाणार आहे. आश्वासन देणाऱ्या अधिकार-यांचा तीव्र निषेध करण्यात येत आहे. असे निवेदनात.सौ. डाफळे, श्री. रावराणे यांनी म्हटले आहे.
