तारकर्ली सरपंच स्नेहा केरकर यांनी केले होते उपोषण
मालवण (प्रतिनिधी) वायरी केळबाई मंदिर ते तारकर्ली- देवबाग रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम १५ डिसेंबर पूर्वी पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन मालवणच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने दिल्याने तारकर्लीच्या सरपंच सौ स्नेहा जितेंद्र केरकर यांनी सुरू केलेले बेमुदत उपोषण स्थगित केले आहे तर आज सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामास सुरुवात केल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे गेली दीड दोन वर्षे पर्यटन दृष्ट्या विकसित झालेल्या तारकर्ली देवबागकडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्डेच खड्डे पडल्याने वायरी केळबाई मंदिर ते तारकर्ली- देवबाग हा रस्ता सर्वांच्या टीकेचे लक्ष बनले होते अलीकडच्या काळात तर खड्ड्यांवरून बॅनरबाजीही झाली होती वायरी केळबाई मंदिर ते तारकर्ली- देवबाग या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम होण्याबाबत तारकर्ली सरपंच सौ. स्नेहा केरकर यांनी बेमुदत उपोषण सुरू केले होते, मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडून लेखी आश्वासन मिळाल्याने स्नेहा केरकर यांनी बेमुदत उपोषण स्थगित केले. याबाबत स्नेहा केरकर यांनी प्रसिद्धीपत्रका द्वारे माहिती दिली आहे. तारकर्ली देवबाग रस्त्याच्या तारकर्ली ग्रा. पं. कार्यक्षेत्रातील रस्त्याचे डांबरीकरण हे हॉटमिक्स पद्धतीने तसेच सदर रस्ता हा वायरी भूतनाथ, तारकर्ली आणि देवबाग अधिपत्याखाली येत असल्याने गटार व्यवस्था व पर्यटनदृष्ट्या गाजलेल्या या सर्व पर्यटनस्थळात वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून रस्ता रुंदीकरण या प्रमुख मागण्यांसाठी २२ नोव्हेंबर रोजी सहाय्यक अभियंता बांधकाम विभाग कार्यालय मालवण येथे बेमुदत उपोषण सुरु केले होते. त्यावेळी तारकर्ली परिसरातील आवश्यक त्या ठिकाणी साचणाऱ्या पाण्याकरीता आवश्यक ती उपाययोजना, वाहतूक कोंडी होते त्याठिकाणची अतिक्रमणे हटविण्याचे तसेच आवश्यक ठिकाणी गतिरोधक आणि याबाबत ग्रा. पं. कार्यकारणीशी संयुक्तिक बैठक घेत हॉटमिक्स पद्धतीने डांबरीकरण व दोन वर्षे रस्त्याला खड्डा न पडणार व पडल्यास त्यास ठेकेदार जबाबदार राहील या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या लेखी आश्वासनानंतर या रस्त्याचे काम तारकर्ली ग्रा. पं. कार्यक्षेत्रातील १५ डिसेंबरपूर्वी पूर्ण करण्याचे मान्य केल्यामुळे सदर उपोषण तूर्त स्थगित करण्याचा घेण्यात आला आहे, असे स्नेहा केरकर यांनी म्हटले आहे.
