नितेश राणे;कोकिसरेत विविध विकासकामांचा शुभारंभ
*⚡वैभववाडी ता.२६-:* कोकिसरे गावातील ग्रामस्थ आणि आम्ही लोकप्रतिनिधी यांचं नातं आता विश्वासाचं बनलं आहे. विकासकामाची क्षमता फक्त भाजपामध्येच आहे. हे तुम्ही ग्रामपंचायत निवडणुकीच्या विजयानंतर दाखवून दिले आहे. तुम्ही शब्द पाळला, आता विकासाची जबाबदारी माझी आहे. स्थानिक ग्रामस्थांच्या समस्या, मागण्या व विकासकामे पूर्ण करण्यासाठी मी सदैव कटिबद्ध आहे असे अभिवचन आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केले. निवडणूका आल्या की गावात मते मागत बोंबलत फिरणाऱ्या विरोधकांना विकासकामाबाबत काय दिवे लावले हे देखील विचारण्याचे धाडस ग्रामस्थ व युवक वर्गाकडे असले पाहिजे. असा सल्लाही त्यांनी दिला. कोकिसरे गावातील सात विकासकामांचा शुभारंभ आमदार नितेश राणे यांच्या हस्ते गुरुवारी पार पडला. यावेळी महालक्ष्मी विद्या मंदिरच्या पटांगणावर पार पडलेल्या सभेत आमदार नितेश राणे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भाजपा तालुकाध्यक्ष नासीर काझी, सभापती अक्षता डाफळे, माजी सभापती जयेंद्र रावराणे, उपसभापती अरविंद रावराणे, माजी सभापती भालचंद्र साठे, जि. प. सदस्य सुधीर नकाशे, शारदा कांबळे, सरपंच दत्ताराम सावंत, बंड्या मांजरेकर, नवलराज काळे, केंद्रप्रमुख श्री पवार, प्रदीप जैतापकर, वसुधा आमरसकर, बाळा वाडेकर, बंधू वळंजू, संजय सावंत, समिधा सावंत, दाजी पाटणकर, प्रदीप नारकर, अवधूत नारकर, प्रकाश पांचाळ व पदाधिकारी उपस्थित होते. आमदार नितेश राणे म्हणाले, मुख्यमंत्री, पालकमंत्री व खासदार हे सेनेचे आहेत. त्यांची सत्ता आहे. परंतु या मतदारसंघात भाजपाच्या माध्यमातून कामे सुरू आहेत. हे येणाऱ्यांना आपण विचारले पाहिजे. तुम्ही काय काम केलात व पुढे करणार असे रोखठोक मत विरोधकांना विचारले पाहिजे. या मतदार संघात 263 गावे आहेत. त्यामुळे निवेदने देऊन थांबू नका. त्या विकासकामांचा पाठलाग करा. पाठपुरावा करा. मी रडत बसणा-यापैकी आमदार नाही. मला सत्तेची गरज नाही. विकास कामे खेचून आणण्याची आमच्यात धमक आहे. जनतेसाठी अधिकाऱ्यांना घाम फोडायचे ट्रेनिंग आमच्या नेतृत्वाने आम्हाला दिले आहे. त्यामुळे निधीची चिंता यापुढे देखील करू नका. परंतु निधीचा वापर व विकास कामे दर्जेदार करून घेण्याची जबाबदारी ही ग्रामस्थांची असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आमदार नितेश राणे यांनी शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी पक्ष यांचा चांगलाच समाचार घेतला. ज्यांची लायकी नाही ते आज राणे साहेबांवर टिका करत बसले आहेत. जे गल्ली सोडत नाहीत, ज्यांना गल्लीत कोण ओळखत नाहीत. ते आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांसोबत काम करणाऱ्या राणे साहेबांवर टीका करत आहेत. अशावेळी राणे साहेबांच्या मागे आपण भक्कम ताकद उभी केली पाहिजे असे नितेश राणे म्हणाले. मुख्यमंत्री हे कायम आजारी आहेत. आजारी मुख्यमंत्री असा त्यांना शिक्का बसला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्ष हे व्हेंटिलेटरवर आहेत. त्यामुळे त्यांच्या कडून फारशा अपेक्षा ठेवू नका असे नितेश राणे यांनी सांगितले. यावेळी सुधीर नकाशे, अरविंद रावराणे, जयेंद्र रावराणे, नासीर काझी, सौ. डाफळे यांनी मार्गदर्शन केले. कोकिसरे गावातील भूमीपूजन करण्यात आलेली विविध विकास कामे पुढील प्रमाणे – कोकिसरे महालक्ष्मी प्राथमिक शाळा कंपाउंड वॉल बांधणे – निधी 10 लाख, कोकिसरे चराची पांदण रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे – 10 लाख, कोकिसरे श्री महालक्ष्मी मंदिर ते बौद्धवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे – 5 लाख, कोकिसरे सिद्धेश्वरवाडी शाळा ते घंगाळे रस्ता – 5 लाख, कोकिसरे मुख्य रस्ता ते ओझरवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे – 4 लाख, कोकिसरे नारकरवाडी मांगरवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे – 5 लाख, कोकिसरे नारकरवाडी धनंजय नारकर घर रस्ता खडीकरण करणे 4 लाख, आदी कामांचा समावेश आहे. या सर्व कामांचा शुभारंभ आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत पार पडला. या प्रसंगी विविध विकास कामाची निवेदने देण्यात आली. विविध मंडळाच्या वतीने, ग्रामपंचायतच्या वतीने आमदार नितेश राणे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदकिशोर प्रभु, तर आभार अक्षय कानेटकर यांनी मानले.
