मळगाव येथील ‘त्या’ पुलाची दुरवस्था

भगदाडांमुळे पूल वाहतुकीसाठी धोकादायक;दुरुस्ती करण्याची ग्रामस्थांची मागणी

*⚡सावंतवाडी ता.२६-:* मळगाव येथील श्री रवळनाथ मंदिरच्या मागील बाजूने वाहणाऱ्या ओहोळावरील पुलाची अत्यंत दुरवस्था झाली आहे. मोठमोठ्या भगडादांमुळे सद्यस्थितीत हा पूल वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक झाला आहे. पावसाळ्यात हा पूल वारंवार पाण्याखाली जात असल्याने ग्रामस्थ्यांची गैरसोय होत आहे. या पुलाची उंची वाढवून दुरुस्ती करण्याची गरज असून ग्रामपंचायतीने याची त्वरित दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे. स्मशानभूमीनजीक असलेल्या या पुलाच्या ठिकाणी जुना पूल होता. त्यावरून येणे-जाणे धोकादायक असल्याने तसेच हा पूल जीर्ण झाल्याने ग्रामस्थांच्या मागणीवरून पाच – सहा वर्षांपूर्वी नवीन पूल बांधण्यात आला. मात्र, नवीन पुलाची उंची फारच कमी असल्याने अतिवृष्टीमध्ये हा पूल पाण्याखाली जातो. त्यामुळे रस्ता बंद होऊन ग्रामस्थांची तसेच मळगाव हायस्कूलमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय होते. तसेच या पुलाला मोठी भगदाडे पडली आहेत. सद्यस्थितीत ही भगदाडे जांभ्या दगडाने तात्पुरती बुजविण्यात आली आहेत. पण हा उपाय पुरेसा नसून पुलाची पूर्णतः दुरुस्ती होणे गरजेचे आहे. अन्यथा भविष्यात मोठी दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. पुढील पावसाळ्याआधी या पुलाची दुरुस्ती करावी. तसेच पुलाची उंची वाढविण्यासाठी निधीची तरतूद करावी,अशी मागणी ग्रामस्थातून होत आहे.

You cannot copy content of this page