१७२ जागांसाठी २१ डिसेंबर रोजी निवडणूक
*⚡ओरोस ता.२६-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगर पंचायतींप्रमाणे ग्रामीण भागात सुद्धा निवडणूक रणधुमाळी सुरू झाली आहे. १३० ग्राम पंचायत कार्यक्षेत्रातील सदस्यांच्या रिक्त जागांसाठी २१ डिसेंबर २०२१ रोजी मतदान होणार आहे. १७२ जागांसाठी या पोट निवडणुका होत आहे. त्यामुळे १३० गावांत आचारसंहिता लागू झाली आहे. मयत, राजीनामा व अपात्र या कारणाने जिल्ह्यातील ग्राम पंचायतमध्ये रिक्त झालेल्या ग्राम पंचायत क्षेत्रात पोट निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील १३० ग्राम पंचायतीचा यात समावेश असून १७२ जागांसाठी निवडणूक होणार आहे. यामध्ये वेंगुर्ले १० ग्राम पंचायती ११ सदस्य, सावंतवाडी १५ ग्राम पंचायती १८ सदस्य, कणकवली १९ ग्राम पंचायती २३ सदस्य, वैभववाडी १४ ग्राम पंचायती १८ सदस्य, कुडाळ १२ ग्राम पंचायती २० सदस्य, दोडामार्ग १६ ग्राम पंचायती २४ सदस्य, देवगड २३ ग्राम पंचायती ३२ सदस्य आणि मालवण २१ ग्राम पंचायती २६ सदस्य अशाप्रकारे समावेश आहे. यासाठी ३० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर २०२१ या कालावधीत नामनिर्देशन अर्ज स्वीकारले जाणार आहेत. दाखल अर्जाची छाननी ७ डिसेंबर रोजी करण्यात येणार आहे. ९ डिसेंबर रोजी अर्ज मागे घेता येणार आहेत. गरज असलेल्या सदस्य निवडीसाठी २१ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या कालावधीत मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. तर मतमोजणी २२ डिसेंबर रोजी करण्यात येणार आहे.
