आचारसंहितेमुळे घेतला निर्णय
ओरोस-:महाराष्ट्र शासन विधानसभा आणि विधान परिषदेची पंचायत राज समिती ३० नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येणार होती. मात्र, जिल्ह्यातील नगरपंचायती व ग्राम पंचायती क्षेत्रात निवडणूक आचारसंहिता जाहीर झाल्याने हा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाला तात्पुरता मोठा दिलासा मिळाला आहे. आ संजय रायमुलकर यांच्या अध्यक्षतेखालील ही पंचायत राज समिती जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या कामकाजाबाबत तपासणी करण्यासाठी ३२ आमदारांसह दाखल होणार होती. मात्र, जिल्ह्यातील वाभवे-वैभववाडी, कसई-दोडामार्ग, देवगड व कुडाळ या चार नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाली आहे. तसेच १३० ग्राम पंचायत क्षेत्रात पोट निवडणूक आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. जिल्ह्यात बहुतांश भागात आचारसंहिता लागू झाल्याने येणाऱ्या पीआरसी समितीला कामकाज करताना अडचण येणार होती. आदर्श आचारसंहिता प्रणालीचा भंग होण्याची शक्यता होती. त्यामुळे नियोजित दौरा पीआरसी समितीने पुढे ढकलला आहे. तसे अधिकृत पत्र जिल्हा परिषद प्रशासनाला सायंकाळी प्राप्त झाले आहे. मात्र, पुढे ढकललेला पुढे कधी होणार ? याबाबत कळविण्यात आलेले नाही.
