शिवसेना म्हणजे थापड्या लोकांची संघटना…

केंद्रीय मंत्री नारायण राणें यांची जोरदार टीका

*⚡सावंतवाडी ता.२२ विनय वाडकर-:* आगामी काळात जिल्ह्यात होवू घातलेल्या जिल्हा बँक, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सावंतवाडी तालुक्यातील सर्व भाजप पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत निवडणुकीबाबत मार्गदर्शन केले आहे. यावेळी ते बोलताना म्हणाले की, शिवसेना ही थापाड्या लोकांची संघटना असून, त्यांच्याकडून कोणतेच विकासात्मक काम होणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोर गरीब जनतेसाठी ९ योजना जाहीर करत त्या राबवत आहेत. भाजप वाढला तरच देश सुरक्षित असून, महाराष्ट्राचा विकास भाजपच करू शकतो. त्यामुळे सर्वच निवडणुकात भाजपचा विजय होण्यासाठी पदाधिकारी यांच्यासह कार्यकर्त्यांनी काम सुरू करावे असे आवाहन त्यांनी केले आहे. सर्व कार्यकर्त्यांना पद नक्की मिळेल, कोणावरही अन्याय होऊ देणार नाही असा विश्वास त्यांनी कार्यकर्त्यांना देताना कोणी गदारी केली तर मात्र खपवून घेणार नाही असा सूचक इशारा दिला आहे. यावेळी ते पुढे म्हणाले की, जिल्ह्यात झालेले विमानतळ हे माझ्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात झाले असून, मी केंद्रात मंत्री झाल्या नंतर त्याला मान्यता मिळाली. परंतु, खासदार, पालकमंत्री आणि दोन्ही आमदार मात्र श्रेय घेण्यासाठी धडपड करत होते, जणूकाही आपणच परवानगी आणली अश्या आविर्भावात वावरत आहेत. असा जोरदार हल्ला त्यानी शिवसेनेवर केला आहे. मी विधान सभेवर असताना विधानसभा गदागदा हलवून टाकली होती. परंतु, सावंतवाडीचे आमदार हे पिल्लू असून, सभागृहात काहीच बोलत नाहीत. त्यापेक्षा आमचा सरपंच तरी बरा अशी जोरदार टीका आमदार केसरकर यांच्यावर खासदार नारायण राणे यांनी केली आहे. जिल्ह्यात आमचा खासदार आणि कुडाळ, सावंतवाडीत आमचा आमदार नाही याची खंत असून, आगामी काळात खासदार आणि तिन्ही आमदार आमचेच असतील असा विश्वास त्यांनी व्यक्त करत. आतापासूनच निवडणुकीच्या कामाला लागा असा आदेश कार्यकर्त्यांना दिला आहे.

You cannot copy content of this page