चांगले संस्कार आणि शिष्टाचार हे जीवनात यशाचा मार्ग दाखवितात

सौ. नंदा कुलकर्णी यांचे प्रतिपादन

*⚡मालवण ता.२१-:* आज समाजात चंगळवाद वाढत असताना संस्काराला काहीशी तिलांजली मिळत आहे. जीवनात संस्कार जसे महत्त्वाचे आहेत तसेच शिष्टाचारही महत्त्वाचे आहे. चांगले संस्कार आणि शिष्टाचार हे यशाचा मार्ग दाखवीत असल्याने विद्यार्थ्यांनी या दोन्ही गोष्टींचा वापर करून यशाचा मार्ग चोखाळावा असे प्रतिपादन मुंबई येथील राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर या कंपनीच्या डेप्युटी जनरल मॅनेजर सौ. नंदा कुलकर्णी यांनी येथे बोलताना केले. मालवण येथील भंडारी ए. सो. ज्युनिअर कॉलेजमध्ये मॅनर्स आणि एटिकेटस या विषयावर सौ. नंदा कुलकर्णी यांनी ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांच्या समवेत नारायण कुलकर्णी, भंडारी हायस्कूलचे पर्यवेक्षक एच. बी. तिवले, प्रा. रुपेश बांदेकर, प्रा. स्नेहल पराडकर, प्रा. देवेंद्र चव्हाण, प्रा. जी. टी. दळवी, प्रा. कु. वैभवी वाक्कर आदी व इतर उपस्थित होते. प्रारंभी पर्यवेक्षक एच. बी. तिवले यांनी स्वागत केले तर प्रा. बांदेकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी सौ. नंदा कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना लोकांनी आपल्या बरोबर कसे वागायला हवे हे आपण ठरवतो परंतु आपण लोकांशी कसे वागतो याची फिकीर करीत नाही. दुसऱ्या कडून अपेक्षा ठेवताना आपल्या बद्दलही लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा पूर्ण केल्या पाहिजेत. चांगले संस्कार आणि शिष्टाचार हे गुण आत्मसात केले तर कोणतेही यश मिळविणे कठीण जाणार नाही असे त्या म्हणाल्या. यावेळी सौ. नंदा कुलकर्णी यांचा पर्यवेक्षक एच. बी. तिवले यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.

You cannot copy content of this page