पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांचे कणकवली कॉलेज येथे प्रतिपादन
*⚡कणकवली ता.२१-:* भारत धर्म निरपेक्ष राष्ट्र आहे , आपल्या देशामध्ये विविधते मध्ये एकता लपली आहे युवकांनी समाज माध्यम पसरवलेल्या अफवांना बळी न पडता समाजामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी व जातीय सलोखा राखण्यासाठी प्रयत्न करावे असे मत पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनी व्यक्त केले. कणकवली कॉलेज कणकवली राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांचेमार्फत आयोजित जातीय सलोखा सप्ताहा निमित्त कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. मुंबई विद्यापीठ तर्फे 19 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर या कालावधीमध्ये जातीय सलोखा सप्ताह आयोजित करण्यात येत आहे. या अंतर्गत कणकवली कॉलेज मध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित प्राचार्य डॉ राजेंद्र कुमार चौगुले म्हणाले की, थोर पुरुषांना जाती व धर्म यांच्या आधारे वाटून चालणार नाही. त्यांचे विचार विस्तृत व पूर्ण राष्ट्राच्या उन्नतीसाठी होते, त्यामुळे समाजामध्ये वावरताना माणुसकी हाच धर्म आणि जात असे म्हणून चालायला हवे. या कार्यक्रम प्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख सुरेश पाटील यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रम प्रसंगी प्रा. सागर गावडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वयंसेविका कु. हर्षदा कुबल हिने केले तर शेवटी आभार स्वयंसेविका कु. साक्षी चव्हाण हिने मानले.
