ll पाऊले चालती सोनुर्लीची वाट ll

सोनुर्ली माऊलीचा आज जत्रोत्सव:दर्शनासाठी होणार लाखो भाविकांची गर्दी;रात्री रंगणार लोटांगण सोहळा

माय माऊली तू माऊली जगाचीl तुझ्या दर्शनाची ओढ मला लागली

सावंतवाडी ता.२०.प्रसन्न गोंदावळे-:* ‘दीनांची माऊली कृपेची सावली’ अशी ख्याती असलेल्या सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली येथील श्री देवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव आज, २० नोव्हेंबर रोजी साजरा होत आहे. गतवर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा जत्रोत्सव झाला नसल्याने दोन वर्षांनी होणाऱ्या या जत्रोत्सवात विक्रमी संख्येने भाविक उपस्थित राहतील, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे सोनुर्लीनगरीत भाविकांची मांदियाळी पाहायला मिळणार आहे.

सोनुर्ली माऊलीचा जत्रोत्सव ‘लोटांगणाची जत्रा म्हणूनही राज्यभरात प्रसिद्ध आहे. शेकडो भाविक लोटांगण घालून माऊली चरणी नतमस्तक होतात. मळगाव आणि सोनुर्ली या दोन गावांचे माऊली हे दैवत असून हा जत्रोत्सव म्हणजे जणू या दोन गावांच्या एकोप्याचे प्रतीक आहे. जत्रेदिवशी सायंकाळी मळगाव येथून तरंगकाठीचे आगमन झाल्यानंतर सोनुर्ली गावाच्या सीमेवर त्यांचे स्वागत केले जाते. त्यानंतर ढोल-ताशाच्या गजरात तरंगकाठी माऊली मंदिरात आणली जाते. तेथे धार्मिक विधिंच्या पूर्ततेंनंतर खऱ्या अर्थाने जत्रोत्सवास सुरुवात होते. असे असले तरी सकाळपासूनच मंदिराकडे भाविकांची वर्दळ सुरु होते. मंदिर परिसरात विविध प्रकारची दुकानें थाटली जातात. मोक्याच्या ठिकाणी जागा मिळविण्यासाठी दुकानदारांची धडपड दोन दिवस आधीच सुरु होते. विविध प्रकारच्या गृहोपयोगी वस्तू, मिठाई, खाजे, खेळणी, कपडे, पादत्राणे आदी दुकानें तसेच शेकडो हॉटेल्स लावली जातात. लाखो रुपयांची उलाढाल या जत्रोत्सवात होते.

सोनुर्ली जत्रोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे लोटांगण सोहळा

रात्री १२ वाजण्याच्या सुमारास लोटांगणांना सुरुवात होते. हा सोहळा ‘याची डोळा याची देही’ पाहण्यासाठी हजारो भाविक आवर्जून उपस्थित असतात. मध्यरात्री २ वाजेपर्यंत हा सोहळा सुरु असतो. शेकडो पुरुष तसेच महिला भाविक माऊली चरणी लोटांगण घालून नवसपूर्ती करतात. दुसऱ्या दिवशी सकाळी ९ नंतर मंदिरातच तुळाभार कार्यक्रम सुरु होतो. आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी काही भाविक साखर, तांदूळ, नारळ, गूळ आदी वस्तूंचा नवस बोलतात. आपली मनोकामना पूर्ण झाल्यानंतर ज्याच्या नावे वरीलपैकी ज्या पदार्थाचा नवस सांगितला असेल, त्याच्या वजनाएवढा तो पदार्थ देवी चरणी अर्पण केला जातो. या सोहळ्यासही भाविकांची गर्दी उल्लेखनीय असते. दुपारी १ वाजेपर्यंत तुळाभार कार्यक्रम सुरु असतो. या कार्यक्रमानंतर जत्रोत्सवाची सांगता होते. चोख पोलीस बंदोबस्त सोनुर्ली जत्रोत्सवाला हजारो भाविकांची गर्दी होत असल्याने चोख पोलीस बंदोबस्त ठेवला जातो. कोणतीही अप्रिय घटना घडू नये, यासाठी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पोलिसानी चोख नियोजन केले असून ठिकठिकाणी पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. त्यांच्या मदतीला होमगार्डही असणार आहेत. त्याचप्रमाणे स्वयंसेवकही भाविकांच्या सेवेसाठी ठेवण्यात येणार आहेत. एकूणच जत्रोत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी पोलीस, देवस्थान समिती यांनी कंबर कसली आहे. एसटी संपाचा बसणार फटका सध्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु असल्याने सोनुर्ली जत्रोत्सवासाठी लांबून येणाऱ्या भाविकांना खासगी वाहनांशिवाय पर्याय नाही. त्यामुळे त्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे. तसेच एसटी महामंडळाचेही लाखो रुपयांचे नुकसान होणार आहे. ‘मास्क’चा वापर अनिवार्य कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जत्रोत्सवास येणाऱ्या भाविकांनी मास्कचा वापर करावा, असे आवाहन देवस्थान समितीने केले आहे.

You cannot copy content of this page