*⚡कणकवली ता.१७-:* मालवणसह एकूण सात गावांची मुळ ग्रामदैवता असलेल्या नांदरुखच्या श्री देव गिरोबाचा वार्षिक जत्रोत्सव येत्या रविवार २१ नोव्हेंबरला होणार आहे. नयनरम्य फटाक्यांची आतषबाजी हे या जत्रेचे खास आकर्षण असते. छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ला बांधताना नांदरुख गावात मुख्य बाजारपेठ वसविली होती. या गावातून घोडेस्वारी करीत त्यांनी मालवण गाठले होते. त्यावेळी मालवण शहर नगरपालिकेसह कुंभारमाठ, घुमडे, आनंदव्हाळ, कर्लाचाव्हाळ, कातवड या विद्यमान पाच ग्रामपंचायती या नांदरुख गावच्या मुळ वाड्या होत्या. त्यामुळेच गिरोबा ही ग्रामदेवता पुर्वीच्या याही सात वाड्यांची मुळ ग्रामदेवता आहे. हा इतिहास समजल्याने या सर्वंच भागातील भाविक गेल्या काही वर्षांत हजारोंच्या संख्येने जत्रोत्सवाला अलोट गर्दी करतात. रात्रो साडेनऊच्या दरम्यान पलिकडील वाडीतून सजवलेल्या पालखीचे वाजत गाजत मंदिराकडे आगमन होते. त्यावेळी सुमारे अर्धा-पाऊण तास भक्तगणांनी स्वत:च्या पैशातून आणलेल्या आकर्षक, नयनरम्य शोभेच्या फटाक्यांची आतषबाजी केली जाते. ही आतषबाजीचा अनुभव घेण्यासाठी जत्रोत्सवातील भाविका़ंप्रमाणै उंचावर असलेल्या कुंभारमाठ या ठिकाणी शेकडोजण गर्दी करतात.पालखीच्या प्रदक्षिणा मार्गावरही फटाक्यांची आतषबाजी आणि ढोलताशांचा गजर होतो. रात्रो बाराच्या दरम्यान वालावलकर दशावतारी नाट्य मंडळाचे नाटक सुरू होते. पहाटे दहीहंडीच्या परंपरेतून दहिकाल्याची सांगता होती.
नांदरुखच्या गिरोबाचा २१ नोव्हेंबर रोजी जत्रोत्सव
