पोलिसांच्या पदराआडून भाजप नेत्यांची बदनामी केल्यास धनुष्यच मोडून टाकू;भाजपाच्या आनंद शिरवलकर यांचा इशारा
*⚡कुडाळ ता.०७-:* भाजपच्यावतीने ठेकेदार शिवसैनिकांच्या भ्रष्टाचारी बांधकामांची चौकशी लावल्याने कुडाळ शिवसेनेला मिरची लागली आहे. त्यातून आपल्या नेत्यांच्या बदनामीची तक्रार करून पोलिसांच्या पदराआडून भाजपा कार्यकर्त्यांवर बाण मारल्यास धनुष्यच तोडून टाकू, असा इशारा भाजपा जिल्हा कार्यकारिणी सदस्य आनंद शिरवलकर यांनी दिला आहे. युवासेना प्रमुख आदीत्य ठाकरे, पालकमंत्री ना उदय सामंत व शिवसेना नेत्यांबद्दल अश्लिल पोस्ट सोशल मिडीयावर टाकुन बदनामी करणा-यांवर गुन्हा नोंद करावा, या मागणीचे निवेदन युवासेनेच्या वतीने जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट व शिवसेनेचे अतुल बंगे यांनी दिले आहे. या पोस्ट टाकणा-यांवर कडक कारवाई करावी. अन्यथा युवासेना स्टाईलने कारवाई होईल, असा इशारा देऊन तशी तक्रार आज कुडाळ पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. याबाबत शिवसेनेवर टीका करताना शिरवलकर यांनी म्हटले आहे की, मुळातच युवासेना स्टाईलने कारवाई करण्याची धमक या रडव्या शिवसैनिकांमध्ये असती तर खोट्या तक्रारी देऊन पोलिसांच्या पदराआड लपण्याची वेळ आली नसती. सोशल मीडियावरून भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या जीवाला धोका उत्पन्न करण्याच्या धमक्या दिल्या गेल्या आहेत. हे आमदार वैभव नाईक यांना दिसले नाही का? आमदार वैभव नाईक यांच्यावर टीकेचा त्रास का व्हावा? पेट्रोल दरवाढ झाली म्हणून आपला पेट्रोलपंप सोडून राणेसाहेबांच्या पेट्रोलपंपावर बिनपैशाचा तमाशा करणारे वैभव नाईक आता कुठल्या बिळात लपले आहेत, असा प्रश्नही शिरवलकर यांनी केला आहे. केंद्रसरकार पाठोपाठ इतर राज्यांनी आपापला कर कमी करत पेट्रोल स्वस्त करत जनतेला दिलासा दिला. पण महाराष्ट्रातील वसुली सरकार अजूनही वसुलीच्याच पाठीशी आहे. आता वैभव नाईक यांना सरकारला जाब विचारण्यासाठी आंदोलन करायची हिंमत का होत नाही? सत्तेचा गैरफायदा घेऊन भ्रष्टाचार आणि अपयश लपवण्यासाठी कायद्याचा दुरूपयोग शिवसेनेने करू नये. भाजपाच्या कोणत्याही कार्यकर्त्यांवर खोट्या तक्रारीवरून एकतर्फी पोलीस कारवाई झाल्यास भाजपा ती सहन करणार नाही. कोणाला जर युवासेना स्टाईल दाखवायची एवढीच खुमखुमी आली असेल तर केव्हाही वेळ आणि ठिकाण देऊन समोर या. तुमची सत्तेची मस्ती जिरवायला आम्ही समर्थ आहोत. त्यासाठी आम्हाला तुमच्यासारखी सत्ता आणि पोलिस संरक्षण लागत नाही, असा इशारा कुडाळ भाजपा सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी सदस्य युवा नेते आनंद शिरवलकर यांनी दिला आहे.
