उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांचा सवाल
*💫मालवण दि.२३-:* मालवणचे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर हे एककलमी कार्यक्रम राबवत असून आपल्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकाराखाली त्यांनी एकाच प्रभागात १५ लाख रुपयाच्या निधीची नऊ कामे मंजूर केली आहेत. शहरातील इतर प्रभागात अनेक समस्या असताना नगराध्यक्ष एकाच प्रभागात निधी खर्च करत आहेत. इतर प्रभागांचा आणि जनतेला दिलेल्या आश्वासनांचा नगराध्यक्षांना विसर पडला आहे का ? कांदळगावकर हे एका शहराचे नगराध्यक्ष आहेत की एका प्रभागाचे आहेत, असे टिकायुक्त सवाल मालवणचे उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांनी उपस्थित केला आहे. मालवण नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष दालनात आयोजित पत्रकार परिषदेत उपनगराध्यक्ष राजन वराडकर व नगरसेवक गणेश कुशे हे बोलत होते. यावेळी वराडकर म्हणाले, निवडणुकीच्या वेळी महेश कांदळगावकर यांनी जनतेला विविध आश्वासने दिली होती. मात्र आज ते एकाच प्रभागातील विकासकामांवर निधी खर्च करत आहेत. नगरपालिका कायद्याने दिलेल्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकारात एकाच प्रभागात निधी खर्च करणे कितीपत योग्य आहे हे कांदळगावकर यांनी स्पष्ट करावे. नगरपालिकेत शिवसेनेचे जे दोन वेळा निवडून आलेले नगरसेवक आहेत, त्यांनाही विश्वासात घेऊन त्यांचीही कामे नगराध्यक्ष कांदळगावकर यांनी करावीत. शहरातील दांडी सारख्या भागात शिवसेनेचे तीन निष्ठावान नगरसेवक आहेत. दांडी भागाने शिवसेनेला भरघोस मतदान केलेले असताना त्या भागावर शिवसेनेचेच नगराध्यक्ष असणारे कांदळगावकर अन्याय का करत आहेत ? असे सवालही वराडकर यांनी उपस्थित केले. मालवण शहरात अनेक समस्या प्रलंबित आहेत. नगरपालिकेत इतर प्रभागांचे नगरसेवकही आहेत. मात्र नगरसेवक एकाच प्रभागातील नगरसेवकाला खुश करण्यासाठी त्याच्या प्रभागातील कामे मंजूर करत आहेत. कर्मचारी म्हणून २० वर्षाच्या असलेल्या अनुभवाचे कौशल्य नगराध्यक्ष कांदळगावकर हे दाखवत आहेत. शहरात मोकाट गुरे, कुत्रे यांचा प्रादुर्भाव, स्ट्रीट लाईट प्रश्न, अग्निशमन बंबाची कमतरता अशा अनेक समस्या असताना त्या सोडविण्याकडे नगरध्यक्षांचे लक्ष नाही, अशी टीका गणेश कुशे यांनी यावेळी बोलताना केली.
