लोकप्रतिनिधी सह मराठा समाज संघटना व सर्वपक्षीय यांना निमंत्रण:समीर नलावडे
*⚡कणकवली ता.०३-:* छत्रपती शिवाजी महाराज हे तमाम महाराष्ट्रवासीयांचे आराध्य दैवत आहेत त्यामुळे महामार्ग चौपदरीकरणामुळे सर्व्हिस रस्त्यावर असलेला कणकवली येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अन्य ठिकाणी स्थलांतरीत होणे आवश्यक आहे.पुतळ्याच्या स्थलांतराबाबत आता ठोस निर्णय घेण्याची वेळ आली आहे म्हणूनच विषयावर निर्णय घेण्यासाठी कणकवली नगरपंचायत येथे ८ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता निर्णायक बैठक आयोजित करण्यात येणार आहे. या बैठकीला पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार नितेश राणे, आमदार वैभव नाईक यांच्यासह कणकवलीतील सर्व माजी आमदार आणि कणकवली शहरातील सर्वपक्षीय पदाधिकारी, नगरसेवक, लोकप्रतिनिधी यांसोबत मराठा समाज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना देखील या बैठकीला उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यात येणार आहे, अशी माहिती कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली. कणकवली नगरपंचायत येथे आयोजित पत्रकार परिषदेत नगराध्यक्ष समीर नलावडे बोलत होते. ते म्हणाले, कणकवली शिवाजी महाराज चौकात असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हायवेचे चौपदरीकरण झाल्यानंतर सर्व्हिस रोडच्या मध्यभागी आला. या पुतळ्याच्या स्थलांतराबाबत अनेकदा चर्चा झाल्या. परंतु चौपदरीकरणाच्या कामात या पुतळ्याच्या स्थलांतराचा प्रश्न प्रलंबित राहिला. त्यामुळे आता या विषयावर निर्णय घेण्यासाठी कणकवली नगरपंचायत येथे ८ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता निर्णायक बैठक आयोजित करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे तमाम महाराष्ट्रवासीयांचे आराध्य देवत असून त्यांच्या पुतळ्याच्या स्थलांतरणाबाबत सर्वानुमते एकमुखी निर्णय व्हावा आणि सर्वानुमते ठरलेल्या जागेवर पुतळ्याचे स्थलांतरण होत हा प्रश्न मार्गी निघावा, याकरिता पुढाकार घेत ही बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती नलावडे यांनी दिली. महामार्ग चौपदरीकरणाच्या कामात मागील तीन वर्षे पुतळ्याच्या स्थलांतराचा प्रश्न प्रलंबित राहिला. त्यामुळे सद्यस्थितीत महामार्गाच्या सर्विस रस्त्यावरच असलेल्या पुतळ्याचे योग्य जागी स्थलांतर करण्याची गरज आहे. याबाबत आता ठोस निर्णय घेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे ही बैठक घेण्यात येत असून या बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले आहे.
