नूतन अध्यक्षपदी मकरंद नाईक:सुनिती नाईक आणि कृष्णा बिले यांना रोटरीचे पुरस्कार जाहीर..
⚡कुडाळ ता.२९-: रोटरी क्लब ऑफ कुडाळचा वार्षिक पदग्रहण सोहळा बुधवार, दिनांक १ जुलै रोजी ‘महालक्ष्मी हॉल, कुडाळ’ येथे आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात नूतन अध्यक्ष म्हणून रो. मकरंद नाईक, सचिवपदी रो. राकेश म्हाडदळकर आणि खजिनदारपदी डॉ. जयश्री केसरे यांच्यासह इतर नवीन पदाधिकारी अधिकृतपणे आपले पद ग्रहण करणार आहेत, अशी माहिती मावळते अध्यक्ष राजीव पवार यांनी हॉटेल स्पाईस कोकण येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी नूतन अध्यक्ष मकरंद नाईक, ऍड. राजीव बिले, प्रणय तेली यांनी देखील रोटरीच्या प्रवासाविषयी माहिती दिली. यंदाचा ‘कै. सौ. राजश्री एकनाथ पिंगुळकर स्मृती रोटरी ज्ञानज्योती पुरस्कार’ श्री कलेश्वर माध्यमिक विद्यालय नेरूरच्या मुख्याध्यापिका सौ. सुनिती शेखर नाईक यांना तर घावनळे येथील कृष्णा लक्ष्मण बिले यांची या वर्षाच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याची घोषणा यावेळी करण्यात आली.
या पत्रकार परिषदेला रो. मकरंद नाईक, रो. राकेश म्हाडदळकर, रो. राजन बोभाटे, रो. गजानन कांदळगावकर, डॉ. जयश्री केसरे, रो. ऍड राजीव बिले, प्रणय तेली आदी मान्यवर उपस्थित होते. या दिमाखदार सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी क्लब ऑफ सांगलीचे माजी अध्यक्ष व रोटरी डिस्ट्रिक्ट ३१७२ चे DGND, प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. सुहास जोशी हे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
मावळते अध्यक्ष राजीव पवार यांनी आपल्या कारकिर्दीचा आढावा घेताना सांगितले, गेल्या २०२५-२६ या रोटरी वर्षात कुडाळ क्लबने विविध दर्जेदार आणि सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम राबवले. यामध्ये भव्य रक्तदान शिबीर व आरोग्य शिबिरे, हाफ मॅराथॉन आणि ‘इन्स्पायर’ सायकल स्पर्धा, शैक्षणिक ॲपचे वितरण आणि गरजू विद्यार्थ्यांना १०० सायकलींचे वाटप, पर्यावरण पूरक १० हजार वृक्षारोपण मोहीम, रुग्णांसाठी ‘डायलॅसिस युनिट’ची उभारणी, खवय्यांसाठी ‘रोटरी फूड फेस्टिव्हल’चे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. हे सर्व भरगच्च उपक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी दिलेल्या साथीबद्दल मावळते अध्यक्ष राजीव पवार यांनी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.
नूतन अध्यक्ष रो. मकरंद नाईक यांनी आगामी २०२६-२७ या रोटरी वर्षातील आपले संकल्प जाहीर केले. क्लबचे ३३ वे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारताना ते म्हणाले की, “रोटरी डिस्ट्रिक्ट ३१७० चे प्रांतपाल रो. डॉ. लेनी डिकोस्टा (गोवा) व उपप्रांतपाल रो. संजय रावराणे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मैत्री आणि सेवा’ या रोटरीच्या ब्रीदवाक्याला अनुसरून काम केले जाईल. आगामी काळात शिक्षण, आरोग्य आणि समाजातील वंचित-गरजू घटकांसाठी विविध कल्याणकारी योजना व उपक्रम राबविण्याचा आमचा मानस आहे.
यावेळी ऍड. राजीव बिले आणि प्रणय तेली यांनी देखील रोटरी क्लब ऑफ कुडाळच्या ३३ वर्षांच्या कार्याचा आढावा घेतला. गेल्या ३३ वर्षात ३३ लीडर तयार करण्यात रोटरी क्लब यशस्वी झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
यंदाचा ‘कै. सौ. राजश्री एकनाथ पिंगुळकर स्मृती रोटरी ज्ञानज्योती पुरस्कार’ श्री कलेश्वर माध्यमिक विद्यालय नेरूरच्या मुख्याध्यापिका सौ. सुनिती शेखर नाईक यांना त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी प्रदान करण्यात येईल. तसेच सामाजिक जाणीव ठेवून श्री लिंगेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, तुळसुली येथे इयत्ता ८ वी मध्ये शिकणारी घावनळे-खोचरेवाडी येथील होतकरू विद्यार्थिनी कु. सोनिया आनंद झोरे हिला पुढील शिक्षणासाठी रु. ५,०००/- ची रोख आर्थिक मदत दिली जाणार आहे. घावनळे खुटवळवाडी येथील ‘साई ओमकार डेकोरेटर’चे कृष्णा लक्ष्मण बिले यांची या वर्षाच्या उत्कृष्ट व्यवसायिकता पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
रोटरीचे दरवर्षी प्रकाशित होणारे ‘सिंधुरत्न बुलेटीन’ यंदाही मान्यवरांच्या हस्ते प्रसिद्ध केले जाईल. संपादक तथा ज्येष्ठ रोटरी सदस्य काशिनाथ सामंत सर यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होईल. त्याचबरोबर रोटरी सदस्यांच्या १० वी, १२ वी व पदवी परीक्षेत विशेष यश मिळवलेल्या गुणवंत पाल्यांचा, तसेच विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवणाऱ्या रोटरी सदस्यांचा विशेष सन्मान या सोहळ्यात केला जाणार आहे.
या भव्य पदग्रहण सोहळ्यास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध रोटरी क्लबचे पदाधिकारी, सदस्य, इनरव्हील क्लबच्या सदस्या आणि विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
