⚡दोडामार्ग,ता.२९-:
श्री देवी शांतादुर्गा देवस्थान, उसप (नोंदणी क्र. ए-४१०) यांच्या विश्वस्त मंडळाच्या निवडणुकीत श्री. प्रकाश सखाराम गवस यांच्या नेतृत्वाखालील ‘श्री देवी शांतादुर्गा पॅनल’ने ६ पैकी ५ जागांवर विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले. निवडणूक उत्साहपूर्ण वातावरणात आणि शांततेत पार पडली.
नवनिर्वाचित विश्वस्तांनी यापूर्वीही देवस्थानचा कारभार प्रामाणिकपणे, पारदर्शकपणे व जबाबदारीने सांभाळला होता. त्यांच्या कार्यपद्धतीवर समाधान व्यक्त करत मानकरी व भाविकांनी पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास दाखवत भरघोस पाठिंबा दिला. हा विजय मानकऱ्यांच्या एकजुटीचा, वंशपरंपरागत हक्कांच्या जपणुकीचा आणि श्री देवी शांतादुर्गा मातेच्या कृपाशीर्वादाचा असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
नवनिर्वाचित विश्वस्तांची निवड पुढीलप्रमाणे झाली आहे :
सातेरकर मानकरी : श्री. प्रदीपसिंह इंद्रसेन देसाई, श्री. विरसेन प्रतापराव देसाई
ब्राम्हणीकर मानकरी : श्री. प्रकाश सखाराम गवस, श्री. राजेश वासू गवस
केळबेकर मानकरी : श्री. भूपेश नारायण गवस
घाडीवसकर मानकरी : श्री. भरत अर्जुन गवस
ही निवडणूक प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी श्री. द. ल. सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तसेच सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, कोल्हापूर विभागाचे निरीक्षक श्री. सत्यनारायण पुंडलिक शेणई व श्री. बापू शिवराम जाधव यांच्या उपस्थितीत आणि देखरेखीखाली मतदान व मतमोजणी प्रक्रिया शांततेत पूर्ण करण्यात आली.
विजयानंतर नवनिर्वाचित विश्वस्तांनी सर्व ग्रामस्थ, मानकरी, भाविक तसेच निवडणूक प्रक्रियेत सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले. देवस्थानचा अधिकृत कार्यभार स्वीकारल्यानंतर धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
देवी शांतादुर्गा देवस्थान उसप विश्वस्त निवडणुकीत ‘श्री देवी शांतादुर्गा पॅनल’चा दणदणीत विजय…
