Headlines

वटपौर्णिमेनिमित्त श्री देवी शांतादुर्गा हायस्कूलमध्ये पर्यावरण संवर्धनाचा संदेश…

वटवृक्ष पूजनासह वृक्षारोपण; विद्यार्थ्यांनी घेतली पर्यावरण रक्षणाची शपथ..

⚡मालवण,ता.२९-:
वटपौर्णिमा सणाचे औचित्य साधत वडाचापाट येथील श्री देवी शांतादुर्गा हायस्कूलमध्ये राष्ट्रीय हरितसेनेच्या वतीने पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. यावेळी शाळेच्या आवारातील वटवृक्षाचे विधिवत पूजन करण्यात आले. तसेच परिसरात विविध वृक्षांची लागवड करून पर्यावरण संरक्षणाचा संकल्प करण्यात आला.
‘वृक्ष हे मानवाचे खरे मित्र आहेत’ हा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविताना वृक्षसंवर्धन ही काळाची गरज असल्याचे अधोरेखित करण्यात आले. “पर्यावरण रक्षणाचे आम्ही वारकरी, प्रदूषणमुक्त करू पृथ्वी सारी” तसेच “झाडे लावा घरोघरी, पाऊस पडेल सरीवर सरी” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. यावेळी विद्यार्थ्यांनी वृक्ष लागवड करून त्यांचे संगोपन करण्याची सामूहिक शपथ घेतली.
कार्यक्रमात मुख्याध्यापक प्रसाद कुबल यांनी विद्यार्थ्यांना वृक्ष लागवडीचे महत्त्व पटवून देताना, वाढत्या तापमानावर नियंत्रण मिळविण्यासाठी आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने वृक्षारोपण करून त्याचे संवर्धन करण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे, असे प्रतिपादन केले.
याप्रसंगी शिक्षिका वेदिका दळवी, प्रतिभा केळूसकर, विद्यार्थी, पालक तसेच शाळेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page