ओरोस ता २९ “राष्ट्रीय पेन्शन योजना हटवा आणि जुनी पेन्शन योजना लागू करा” या मागणीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघ सिंधुदुर्गच्यावतीने शुक्रवारी दुपारी जिल्हा परिषद प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन छेडण्यात आले. यावेळी अध्यक्ष लक्ष्मण पावसकर, कार्यवाह पांडुरंग काळे, मेघना राऊळ, प्रशांत चव्हाण, संदीप शिंदे, अजय शिंदे, मधुरा तांबे, विशाखा पालव, दत्ताराम कोकरे, बाळकृष्ण रावण आदी यावेळी उपस्थित होते. राज्य सरकारी-निम सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ व महाराष्ट्र राज्य गट ड कर्मचारी महाराष्ट्र यांच्या विद्यमाने राष्ट्रीय पेन्शन बंद करून जुनी पेंशन लागू करण्यासाठी राज्यभर शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर ‘राज्यव्यापी ठिय्या आंदोलन’ करण्यात आले. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी माध्यमिक शिक्षक संघाने पाठिंबा दिला आहे. यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर जिल्हा शाखेच्यावतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी जुनी पेंशन लागू करण्याची मागणी करण्यात आली. चौकट अन्य राज्यांप्रमाणे महाराष्ट्र राज्याने विधानसभा ठरावाद्वारे केंद्र शासनाकडे जुनी पेंशन लागू करण्याची मागणी करावी. शिक्षक व कर्मचारी यांना १० टक्के अंशदान ऐवजी सुधारित १४ टक्के अंशदान रक्कमेची वजावट आयकारासाठी एकूण उत्पन्नातून करण्यात यावी. पूर्वीच्या सेवेचा राजीनामा देऊन नवीन सेवा स्वीकारलेल्या १ नोव्हेंबर २००५ पूर्वी निवड झालेल्या पण उशिरा नियुक्ती आदेश मिळालेल्या २० टक्के व ४० टक्के अनुदानावर कार्यरत असलेल्या सर्व शिक्षक-कर्मचारी यांना जुनी पेंशन योजना लागू करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
जुनी पेंशन सुरू करण्यासाठी ठिय्या माध्यमिक अध्यापक संघाने छेडले आंदोलन
