*⚡वेंगुर्ला ता.२८-:* शिरोडा येथील ताज प्रकल्पासाठी सुमारे २५ ते ३० वर्षांपूर्वी कवडीमोलाने स्थानिकांकडून घेतलेल्या जमिनीचा वाढीव दर मिळावा या स्थानकांच्या प्रश्नाबाबत आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन जमिनीचे मुळ मालक एमटीडीसीच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार निश्चित प्रयत्न करेल आणि ज्या काही येथील देवस्थानच्या विहिरी संदर्भात केसेस स्थानिकांवर झालेल्या आहेत त्या मागे घेण्यासंदर्भात ताज बरोबर बोलणी करून ती विहीर स्थानिकांना उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन खासदार विनायक राऊत यांनी शिरोडा येथे दिले. वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा येथील ताज प्रकल्पासाठीच्या जागेबाबत सर्व्हे नंबर २१२ ते २१५ आणि सर्व्हे २९ ते ३३ या भागातील भूमीपुत्रांच्या जमिनी ताज प्रकल्पासाठी कवडीमोलाने घेतल्या गेल्याने आपल्यावर अन्याय झाल्यामुळे त्या जमिनींचा वाढीव दर मिळवा तसेच येथील लिंगेश्वर मंदिरामध्ये पाण्यासाठी विहीर मारली म्हणून ताज ग्रुप ने यासाठी आडकाठी करून कोर्ट केसेस घातल्या हा आमच्यावर अन्याय आहे त्यामुळे या केसेस मागे घेण्यात याव्यात या मागण्यांसाठी येथील स्थानिकांनी खासदार विनायक राऊत यांची भेट घेऊन निवेदन दिले होते. या पार्श्वभूमीवर खासदार विनायक राऊत यांनी या ठिकाणी भेट देऊन भूमिपुत्रांशी चर्चा करून या जमिनींची पाहणी केली. यावेळी माजी आमदार शंकर कांबळी, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, जि.प. गटनेते नागेंद्र परब, प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, वेंगुर्ले तहसीलदार प्रवीण लोकरे, एमटीडीसीचे दीपक माने, भुमी अभिलेख श्री तुपकर, डॉ. वीर, तालुकाप्रमुख यशवंत परब, उपजिल्हाप्रमुख सुनील डुबळे, सचिन देसाई, युवा सेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, उपजिल्हाप्रमुख सागर नाणोसकर, कुडाळ शिवसेचे अतुल बंगे, शिरोडा वेळागर भूमिपुत्र संघ अध्यक्ष महादेव रेडकर, खजिनदार जगन्नाथ डोंगरे सदस्य राजेंद्र आंदुर्लेकर, शांताराम नाईक विष्णू नाईक, विठ्ठल कांबळी, दिगंबर कांबळी, दीपक पडवळ, भिकाजी नाईक, श्री देव लिंगेश्वर देवस्थान कमिटी विश्वस्त जनार्दन पडवळ, मनोहर होडावडेकर, कमिटीचे अध्यक्ष विजय पडवळ, सचिव श्रीकृष्ण पडवळ, उपाध्यक्ष प्रदीप भगत, शिरोडा ग्रा प सदस्य कौशिक परब, मयूरी राऊळ, मच्छिमार सोसायटी चेअरमन काशीनाथ नार्वेकर, म्हापण विभाग प्रमुख योगेश तेली आदी उपस्थित होते. स्थानिक भूमिपुत्रांनी देवस्थानसाठी विहीर खोदून ताज च्या जमिनीवर फार मोठे काही अतिक्रमण केले असे वाटत नाही. त्यामुळे विहिरीच्या अनुषंगाने ज्या काही केसेस स्थानिकांवर झाल्या त्या मागे घेण्यासंदर्भात ताज बरोबर बोलणी करून कोणत्याही परिस्थितीत मंदिरासाठी आवश्यक असलेली विहीर उपलब्ध करून देणार असे ठोस आश्वासन खासदार विनायक राऊत यांनी दिले. त्यावेळी नारायण राणे यांच्या नादाला लागून मी तोंडघाशी पडलो. माझ्यावर विश्वास ठेवून स्थानिकांनी विकासासाठी जमिनी दिल्या हा फार मोठा अन्याय झालेला आहे. आज जमिनी घेणारे येथील मंदिरासाठी साधी विहीर सुद्धा बांधू देत नाहीत. उलट त्यांनी खटले दाखल केल्या. यापुढे न्याय न मिळाल्यास हे आंदोलन असेच सुरू राहील व विहिरीबाबत यापुढे कोणी आडकाठी केल्यास आम्ही काय पवित्रा घेऊ घेऊन हे त्याचवेळी समजेल. खासदार राऊत यांनी वेळागर सर्व्हे नंबर ३९ नुसार भूमिपुत्र याना जसा न्याय दिला तसाच न्याय याही भूमिपुत्रांना द्यावा. अशी मागणी माजी आमदार शंकर कांबळी यांनी केली.
‘ताज’साठी कवडीमोलाने जमिनी गेलेल्या भूमिपुत्रांना न्याय मिळवून देणार : विनायक राऊत
