घनकचरा व्यवस्थापनात ढिसाळपणा सहन केला जाणार नाही…

नगराध्यक्ष संदेश पारकर यांचा व्यवस्थापनाला इशारा ; जबाबदारांना घेतले फैलावर..

⚡कणकवली ता.११-: शहराजवळील मुडेडोंगरी येथील कणकवली नगरपंचायतीच्या घनकचरा प्रकल्पाची नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी पाहणी करत प्रकल्पातील त्रुटींवर तीव्र नाराजी व्यक्त केली. शहरातील कचरा व्यवस्थापन व्यवस्थित होत नसल्याचे या पाहणीत स्पष्ट झाले असून संबंधित ठेकेदार व कर्मचाऱ्यांना नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी चांगलेच फैलावर घेतले.

पाहणीदरम्यान प्रकल्पात ओला व सुका कचऱ्याचे योग्य वर्गीकरण होत नसल्याचे निदर्शनास आले. शहरातून जमा होणारा कचरा विलगीकरण न करता थेट डेपोमध्ये टाकला जात असल्याचेही आढळले. तसेच ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून खतनिर्मिती करणाऱ्या तीन मशीनपैकी दोन मशीन बंद असल्याचा प्रकार समोर आला. यामुळे कचरा व्यवस्थापनात गंभीर त्रुटी असल्याचे नगराध्यक्ष श्री. पारकर यांनी सांगितले.

नगरपंचायतीकडून घनकचरा व्यवस्थापनासाठी दरवर्षी लाखो रुपये खर्च केले जात असताना प्रकल्प परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. योग्य नियोजन व देखरेखीअभावी ही परिस्थिती निर्माण झाल्याचेही त्यांनी नमूद केले.

पुढे बोलताना श्री. पारकर म्हणाले की, एजीजी डॉटर्सकडे गहाण ठेवलेली जमीन परत नगरपंचायतीच्या ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. येत्या १८ मार्च रोजी होणाऱ्या बैठकीत याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. कागदोपत्री जमीन कंपनीकडे असली तरी सध्या ती नगरपंचायतीच्या ताब्यात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या संपूर्ण प्रकल्पावर दरमहा सुमारे १४ ते १५ लाख रुपयांचा खर्च होत असून साठवलेल्या कचऱ्यावर काय उपाययोजना करायची याबाबत लवकरच नियोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी नगरसेवक जयेश धुमाळे, संकेत नाईक, लुकेश कांबळे, अ‍ॅड. सुदीप कांबळे, कौशिक पारकर, सोहम वाळके यांच्यासह नगरपंचायतीचे स्वच्छता निरीक्षक ध्वजा उचले, पाणीपुरवठा व स्वच्छता अभियंता सोनाली खैरे, बांधकाम अभियंता विभव करंदीकर, शहर समन्वयक जयश्री ठाकरे, मुकादम प्रकाश राठोड, कमलेश भंडारी, विशाल होडावडेकर तसेच ठेकेदार प्रतिनिधी श्री. माने आणि नगरपंचायतीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

बॉक्स :

कचऱ्यातून खत निर्मितीचा विचार

नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घनकचरा प्रकल्पाची पाहणी करताना कचऱ्यापासून उत्पन्न कसे मिळू शकते याची माहिती घेतली. कचऱ्यापासून सेंद्रिय खत निर्मिती करता येऊ शकते, असे त्यांनी सांगितले. यासाठी पुढील काळात विशेष लक्ष दिले जाणार असून या प्रक्रियेमुळे कणकवली नगरपंचायतीला अतिरिक्त उत्पन्न मिळू शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

You cannot copy content of this page