मालवण दि प्रतिनिधी गेले चार दिवस मालवण तालुक्यातील अनधिकृत वाळू उपशावर कारवाईचा बडगा उगारणाऱ्या महसूल विभागाने आज कालावल खाडी पात्रात वायंगणी व तोंडवळी – तळाशील येथे सुरू असलेल्या अनधिकृत वाळू उपशाच्या ठिकाणी कारवाई करत एकूण १४ दगडी रॅम्प महसूल विभागाने उध्वस्त केले. महसूल विभागाच्या या कारवाईमुळे बेकायदेशीरपणे वाळू उपसा करणाऱ्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. मालवण तालुक्यात कालावल व कर्ली खाडीपात्रात सध्या अनधिकृत वाळू उपसा जोरदारपणे सुरू असून याबाबत महसूल प्रशासनाकडून कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. अनधिकृत वाळू उपशाबाबत त्या त्या भागातील स्थानिक ग्रामस्थांकडून तसेच वृत्तपत्रातून आवाज उठविला गेल्यावर महसूल प्रशासनाकडून गेला आठवडाभर कारवाई सुरू आहे. मर्डे डांगमोडे, देवली, आंबेरी, धामापूर, चिंदर तेरई आदी ठिकाणी चाललेल्या अनधिकृत वाळू उपशावर महसूल विभागाने कारवाई केली असतानाच आज सलग तिसऱ्या दिवशीही कारवाईचा सिलसिला सुरू ठेवला. कालावल खाडी पात्रात वायंगणी हुरासवाडी येथे होणाऱ्या वाळू उपशाच्या ठिकाणी ३ दगडी रॅम्प महसुलच्या पथकाने उध्वस्त केले. याठिकाणी कारवाईच्या वेळी वाळू उपसा सुरू नव्हता, मात्र त्याठिकाणी उभारलेले रॅम्प या पथकाने उध्वस्त केले. तर कालावल खाडी पात्रातच तोंडवळी मध्येही अनधिकृतपणे वाळू उपसा सुरू असून तोंडवळी- करंजेवाडी येथे ३ रॅम्प, मधली तोंडवळी येथे ६ रॅम्प तर तळाशीलवाडी येथे २ रॅम्प महसुलच्या पथकाने उध्वस्त केले. मंडळ अधिकारी अजय परब, वायंगणी तलाठी श्री. कंठाळे, भटवाडी तलाठी श्री. माळी, हडी तलाठी श्रीमती भोगटे, पोलीस नाईक श्री. पुजारे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
वायंगणी व तोंडवळी तळाशील येथील अनधिकृत वाळू उपशावर महसुलची कारवाई…
