कालावल आणि कर्ली खाडी पत्रात अनधिकृत वाळू उपसावर पुन्हा एकदा महसूल विभागाची कारवाई…

मालवण दि प्रतिनिधी कालावल खाडी पात्र आणि कर्ली खाडी पात्रात सुरू असलेल्या अनधिकृत वाळू उपशावर महसूल विभागाने आजही धडक कारवाई केली आज कर्ली खाडीपात्रात आंबेरी व धामापूर येथे ११ तर कालावल खाडी पात्रात चिंदर तेरई व भगवंतगड येथे ८ असे एकूण १९ दगडी रॅम्प जेसीबीच्या साहाय्याने उध्वस्त केले. मालवण तालुक्यात सुरू असलेल्या अनधिकृत वाळू उपशाबाबत त्या त्या भागातील स्थानिक ग्रामस्थांकडून तसेच वृत्तपत्रातून आवाज उठविला गेल्यावर महसूल प्रशासनाकडून गेला आठवडाभर कारवाईचे सत्र सुरू केले आहे. काल देवली येथील अनधिकृत वाळू उपसा होणाऱ्या ठिकाणचे १३ रॅम्प उध्वस्त केल्यावर महसूल प्रशासनाने आज आपला मोर्चा कर्ली खाडीपात्रावरील आंबेरी, धामापूर तसेच कालावल खाडी पात्रावरील चिंदर तेरई येथे वळविला. आंबेरी वाकमळा याठिकाणी सुरू असलेल्या वाळू उपशाच्या ठिकाणी उभारलेले ७ दगडी रॅम्प जेसीबीच्या सहाय्याने उध्वस्त करण्यात आले. तर धामापूर येथील ४ रॅम्प तोडण्यात आले. सकाळी साडे अकरा वाजल्यापासून तीन तास ही कारवाई करण्यात आली. आंबेरी तलाठी श्री. शेजवळ, धामापूर मंडळ अधिकारी डी. व्ही. शिंगरे, धामापूर तलाठी श्री. थोरात, नांदरुख कोतवाल स्वप्नील साळकर यांच्या पथकाने ही कारवाई केली. त्याचप्रमाणे महसूल विभागाच्या पथकाने कालावल खाडी पात्रातील वाळू उपसा होणाऱ्या चिंदर भगवंतगड येथे ५ रॅम्प तर चिंदर तेरई येथे ३ रॅम्प जेसीबीच्या साहाय्याने उध्वस्त केले. आचरा मंडळ अधिकारी श्री. परब, चिंदर तलाठी श्री. माळी, हडी तलाठी, भटवाडी तलाठी, चिंदर पोलीस पाटील दिनेश पाताडे, पोलीस नाईक एम. एम. पुजारे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

You cannot copy content of this page