ट्रेझरीमार्फत जि. प. पेन्शनर्सना पेन्शन अदा करावी -प्रा . महेंद्र नाटेकर
*⚡कणकवली ता.२५-:* पेन्शनर्सना दरमहा एक तारखेलाच पेन्शन मिळाली पाहिजे असे शासनाचे सक्त आदेश असूनही गेली अनेक वर्षे जि . प . प्रशासनाने ते धाब्यावर बसविल्यामुळे दर महिन्याच्या 15 ते 30 तारखेपर्यंत केव्हाही पेन्शन दिली जाते . त्यामुळे पेन्शनर्सना तथा जेष्ठ नागरिकांना दैनंदिन अनंत समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याने त्यांच्या मनात जि . प . प्रशासनाच्या विरोधात असंतोष खदखदत आहे . त्यामुळे जि . प . प्रशासनाचा आम्ही जाहीर निषेध करतो , अशी घणाघाती टिका कणकवली तालुका पेन्शनर्स असोसिशनचे अध्यक्ष प्रा . महेंद्र नाटेकर यांनी करून शासकीय पेन्शनरांप्रमाणे ट्रेझरीमार्फत जि . प . पेन्शनर्सना पेन्शन अदा करावी अशी मागणी केली आहे . कणकवली तालुका पेन्शनर्स असोसिएशनची सभा पेन्शनर्स भवनमध्ये आयोजित केली होती . त्यावेळी ते बोलत होते . यावेळी बी . आर. जामदार , विश्वनाथ केरकर , प्रा. पी. बी. पाटील , व्ही. के.चव्हाण , अनंत कदम , अशोक राणे , अरूण गणपत्ये , अनंत घोणे , विद्याधर जोशी , एम . डी . परब , सिध्दार्थ तांबे , गोविंद सावंत , एस.एस. पाटील इत्यादी उपस्थित होते. प्रा . नाटेकर पुढे म्हणाले , सेवानिवृत्त शासकीय कर्मचारी , माध्यमिक शिक्षक तसेच महाविद्यालयीन प्राध्यापक , शिक्षकेतर कर्मचारी यांना ट्रेझरीमार्फत एक तारखेलाच पेन्शन अदा केली जाते . त्याप्रमाणे जि. प. पेन्शनर्स पेन्शन अदा करता येईल . शासनाकडून आलेला पैसा ट्रेझरीमधून काढून जि. प. मार्फत देण्याऐवजी प्रत्यक्ष जि. प. पेन्शनर्सना देता येईल आणि असे झाले तर महाराष्ट्रातील लाखो पेन्शनर्स तथा जेष्ठ नागरिक शासनाला दुवा देतील . असे केल्याने पेन्शनरांचा पैसा अन्य कामासाठी वापरून शेवटी पेन्शनरांना देण्याच्या अपप्रवृत्तीला आळा बसेल , असेही विश्वनाथ केरकर म्हणाले . कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने इतर कार्यालयाप्रमाणेच तालुका व जिल्हा पेन्शन अदालत सुरू करण्याची जोरदार मागणी करण्यात आली. सार्वजनिक विहिरीकडून जाणारा मार्ग पेन्शनर्सभवनकडे जातो . हा मार्ग अतिशय खराब झाला असून त्या मार्गाने जाताना काही पेन्शनर्सचे पाय मुरगळले तर काहींच्या पायांना दुखापती झाल्या . तो मार्ग व्यवस्थित करावा अशी मागणी कलमठ ग्रामपंचायतीकडे गेली दोन वर्षे करीत आहोत , पण अद्यापी कार्यवाही झाली नाही , याचा खेद वाटतो . जर ग्रामपंचायत करू शकत नसेल तर ‘ माधुरी महेंद्र प्रतिष्ठान तो करायला तयार आहे . तशी प्रतिष्ठानला परवनागी द्यावी , अशी ग्रामपंचायतीला विनंती करण्यात आली आहे . पेन्शनर भवनच्या नजिक वाचनालय , ग्रंथालय सुरू करण्यात येत असून त्यात शासकीय नोकऱ्या तसेच एम् . पी . एस्.सी. , आय.ए.एस. चे मार्गदर्शन माधुरी महेंद्र प्रतिष्ठानमार्फत केले जाणार आहे . सेक्रेटरी बी . आर . जामदार यांनी हिशेब सादर करून आभार प्रदर्शन केले .
