Headlines

रस्ता दुरुस्तीच्या आश्वासनानंतर आंबेरी ग्रामपंचायतीचे उपोषण स्थगित…

मालवण (प्रतिनिधी) चौके बावखोल आंबेरी धामापूर येथील निकृष्ट दर्जाच्या रस्त्याबाबत लक्ष वेधुनही रस्ता दुरुस्ती बाबत कोणतीही कार्यवाही होत नसल्याने आंबेरी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ साक्षी कांबळी यांच्या नेतृत्वाखाली आंबेरी ग्रामपंचायतीने उपोषण आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेच्या कार्यकारी अभियंत्यांनी चौके बावखोल आंबेरी धामापूर या नादुरूस्त रस्त्याची दुरूस्ती करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने उपोषण स्थगित केले आहे मालवण तालुक्यातील चौके बावखोल आंबेरी धामापूर रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने वाहनधारकांचे हाल होत होते. या पार्श्वभूमीवर आंबेरी ग्रामपंचायतीने उपोषणास बसणार असल्याचा इशारा दिला होता. यासंदर्भात महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेने संबंधित मक्तेदार व कनिष्ठ अभियंता यांना ग्रामस्थांच्या मागणीनुसार रस्त्याच्या दुरुस्तीचे काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यात रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्याची सूचना केली असून नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत हे काम केले जाईल. कार्पेटचे काम जानेवारी २०२२ अखेरपर्यंत पूर्ण केले जाईल. झाडी हटविण्याबरोबरच साईडपट्टीच्या कामाबाबतही आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या असल्याचे लेखी पत्र कार्यकारी अभियंत्यांनी ग्रामपंचायतीस दिले आहे. त्यानुसार आंबेरी ग्रामपंचायतीच्यावतीने २५ ऑक्टोबरला केले जाणारे उपोषण स्थगित करण्यात आले आहे. हा प्रश्न मार्गी लागावा यासाठी जिल्हा परिषद सदस्य संतोष साटविलकर यांनी आवश्यक पाठपुरावा करीत या रस्त्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे यावेळी सरपंच साक्षी कांबळी, माजी सरपंच राजन सारंग, ग्रामपंचायत सदस्य सचिन आंबेरकर, किशोर वाक्कर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page