सावंतवाडी नगरपालिकेच्यावतीने लवकरच उपक्रम राबविणार-: वैभव नाटेकर
*⚡सावंतवाडी,ता.२१-:* सावंतवाडी नगरपालिकेच्यावतीने लवकरच टाकाऊ कपड्यांपासून पिशव्या, पाय पुसणे, लोड, गोधड्या बनविण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहे. तयार झालेला माल उत्पादन खर्च काढून कमी किंमतीत विक्री केला जाणार आहे. या उपक्रमामुळे शहरातील नागरिकांना रोजगार मिळणार असून शहरात निर्माण होणारा कपड्याचा कचरा कमी होण्यास मदत होणार आहे, असे मत आज येथील आरोग्य विभागाकडुन व्यक्त करण्यात आल्याची माहिती पालिकेेचे आरोग्य निरीक्षक वैभव नाटेकर यांनी दिली. नाटेकर म्हणाले, सावंतवाडी शहरात मोठ्या प्रमाणात कपड्याचा कचरा गोळा होता. त्यात थर्माकोल, चप्पल आणि कपडे आदी कचर्याची विल्हेवाट लावता येत नाही. त्यामुळे आमच्या समोर अनेक प्रश्न होते. आता हा उपक्रम राबविला जाणार असल्यामुळे त्याचा फायदा होणार आहे. कपड्याचा कचरा तर कमी होणार आहे. त्याच बरोबर त्या माध्यमातून तयार करण्यात येणार्या पिशव्या प्लास्टीकला पर्याय म्हणून वापरता येणार आहेत. या पिशव्या खरेदी करण्यात याव्यात, असे आवाहनही मच्छी, मटक विक्रेते आणि व्यापार्यांना करणार आहे. तसेच अन्य कपड्यांपासून बनविण्यात येणारी पायपुसणी, लोड आणि गोधड्या अगदी कमी किमतीत लोकांना विकणार आहोत. नागरीकांकडुन देण्यात येणार्या कपड्यावर प्रक्रिया करुन ते स्वच्छ करण्यात येणार आहेत. आणि त्यानंतर त्यांच्या वस्तू तयार करण्यात येणार आहेत. त्यामुळे या वस्तू पुर्णतः निर्जंतुकीकरण केलेल्या असतील, असे नाटेकर यांनी सांगितले..
