प्लास्टिक प्रदूषण रोखण्यासाठी मालवण डॉक्टर संघटनेचा ‘खारीचा वाटा’ उपक्रम

दुधाच्या प्लास्टिक पिशव्या रिसायकलिंगसाठी जमा करण्याचे आवाहन

*⚡मालवण ता.२०-:* सध्याच्या काळात सर्वच स्तरांवर प्रदुषण वाढत असून त्यामध्ये सर्वात जास्त हवेचे प्रदुषण आणि प्लास्टिकमुळे होणारे पर्यावरणाचे नुकसान मोठे आहे. प्रामुख्याने प्लास्टिकमुळे होणारे प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीने मालवण डॉक्टर संघटनेने पुढाकार घेत ‘खारीचा वाटा’ या नावाने उपक्रम राबविण्याचे ठरविले असून या अंतर्गत दैनंदिन वापरातील दुधाच्या प्लास्टीकच्या पिशव्या गोळा करून त्या रिसायकलिंगसाठी पाठविण्यात येणार आहेत, यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन मालवण डॉक्टर संघटनेतर्फे करण्यात आले आहे. आपल्या दैनंदिन वापरात येणाऱ्या प्लास्टिकच्या दुधाच्या पिशव्या आपण रोज कचऱ्यात टाकून देतो. पण या दुधाच्या आणि ताकाच्या पिशव्या व्हर्जिन प्लास्टिक पासून बनलेल्या असतात. त्यामुळे त्यांचा पुनर्वापर प्रक्रियेसाठी म्हणजेच रिसायकलिंग साठी वापर होऊ शकतो. दररोज पाच कोटी प्लास्टिकच्या पिशव्या वापरात येतात. त्यापैकी फक्त दहा टक्के रिसायकलिंगला जातात. बाकी सर्व जमिनीवर इतर इतरत्र पडलेले असतात, त्यामुळे पाणी जमिनीत मुरू शकत नाही. गायी गुरे हे प्लास्टिक खातात, पक्ष्याच्या चोचीत प्लास्टिक पिशवीचे छोटे टोक अडकते आणि त्यांच्या जीविताला धोका संभवतो. या पिशव्या कचऱ्याच्या डब्यात न टाकता रिसायकलिंगसाठी दिल्या तर त्यातून उपयुक्त वस्तू तयार होऊ शकतात. पाईप्स खुर्च्या, डस्टबिन्स आदी वस्तू तयार होतात. म्हणूनच मालवण मेडिकल असोसिएशनने ‘खारीचा वाटा’ हा उपक्रम सुरू केला आहे. नागरिकांनी संघटनेपर्यंत पोहोचवलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या योग्य ठिकाणी रिसायकलिंगसाठी पाठविण्यात येणार आहेत. भविष्यात हा रिसायकलिंगचा प्लांट मालवणमध्येच सुरू करण्याचाही डॉक्टर संघटनेचा मानस आहे. दुधाच्या किंवा ताकाच्या पिशवीचा कोपरा न कापता ती वरच्या बाजूला आडवी कापावी आणि तो तुकडा पिशवीला चिकटलेला राहू द्यावा. रिकामी पिशवी धुवून वाळवून एक महिनाभर साठवून त्यानंतर संघटनेकडे पोहोचवाव्यात. मालवण वासीयांनी आपला खारीचा वाटा उचलून या उपक्रमात साथ हवी द्यावी. दुधाच्या रिकाम्या वाळवलेल्या व स्वच्छ पिशव्या संघटनेकडे पोहचवाव्यात, असे आवाहन डॉक्टर संघटनेतर्फे करण्यात आले आहे. मालवण शहरातील डॉ. शुभांगी जोशी, (रामेश्वर कॉम्प्लेक्स), डॉ. लीना लिमये, लिमये हॉस्पिटल (भरड), डॉ. पुष्पा माळी (साई मंदिर जवळ, धुरीवाडा), डॉ. राजेश्वरी वझे (नगरपालिकेसमोर) आदी ठिकाणी या पिशव्या आणून द्याव्यात, असेही डॉक्टर संघटनेने म्हटले आहे.

You cannot copy content of this page