*⚡कणकवली ता.०५-:* संसदपटू बँ. नाथ पै यांच्यासारख्या उत्कृष्ट लोकसेवकाचे नाव चिरंतन रहावे यासाठी चिपी येथील विमानतळाला ‘बँ. नाथ पै सिंधुदुर्ग विमानतळ’ हेच नाव द्यावे, अशी मागणी आम्ही सर्वप्रथम केली. विशेष म्हणजे या मागणीला सर्वंच स्तरावरुन उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावरून आजही बँ. नाथ पै यांच्याबद्दल महाराष्ट्रवासियांच्या मनात किती आत्मियता आहे हे स्पष्ट होते, असे प्रतिपादन कोकण विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष मोहन केळुसकर यांनी मुंबईत केले. कोकण विकास आघाडीचा ४३ वा वर्धापनदिन आघाडीच्या दादर-मुंबई येथील कार्यलयात झाला. त्यावेळी ते दूरभाष्यवरुन उपस्थितांना संबोधित करीत होते. यावेळी कोविआचे उपाध्यक्ष रमाकांत जाधव, चिटणीस मनोहर डोंगरे, खजिनदार चंद्रकांत आंब्रे, सदस्य सवश्री नरेंद्र म्हात्रे, संतोष दळवी, अँड. मनोहर मांडवकर, रमेश आग्रे, कोकण बळीराजा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संभाजी काजरेकर आदी उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना केळुसकर यांनी नाथ पै यांचे स्मरण आंतरराष्ट्रीय स्तरावर चिरंतन रहावे या हेतूने आम्ही चिपी विमानतळाला त्यांचे नाव द्यावे, अशी मागणी लावून धरली. प्रसार माध्यमांनी ही मागणी उचलून धरली. राज्यभरातून अनेक संघटनांनीही या मागणीला उत्स्फूर्तपणे पाठिंबा दर्षविला असे सांगून ते म्हणाले, नाथ पै यांचा निस्पृहपणा आणि सर्वसामान्यांमध्ये त्यांच्याबद्दल असलेली आत्मियता माहीत असल्याने कोकणातील सर्वंपक्षिय नेत्यांनी, सामाजिक संघटनांनी चिपी विमानतळाला ‘बँ. नाथ पै सिंधुदुर्ग विमानतळ’ असेच नाव देणे उचित ठरेल असा सूर लावला आहे. नाथ पै यांनी आपल्या पंधरा वर्षांच्या खासदारकीच्या कारकिर्दीत राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय प्रश्नांसह कोकणच्या विकासासाठी अहोरात्र मेहनत घेतली. मात्र त्यांच्या अकाली निधनामुळे त्यांचे कोकण विकासाचे स्वप्न अधुरे राहिले, असे सांगून ते म्हणाले, कोकणच्या विकासासाठी आम्ही गेले ४३ वर्षें कार्यरत आहोत. मात्र कोकणच्या सर्वांगिण विकासाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. तरुणांनी आमच्या खांद्याला खांदा लाऊन हे प्रश्न सोडविण्यासाठी कोविआमध्ये सामिल व्हायला हवे. यावेळी संघटनेचे आधारस्तंभ आणि मुंबईतील ओम अलंकार शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. मधुकर नार्वेकर, तसेच कोविआचे सरचिटणीस सूर्यकांत पावसकर यांचे जेष्ठ पुत्र कै. रमेश पावसकर यांच्या निधनाबाबत श्रद्धांजली वाहण्यात आली.
नाथ पै यांच्याबद्दल महाराष्ट्रवासियांच्या मनात आत्मियत्ता कायम राहील:मोहन केळुसकर
