कणकवली न.पं. प्रशासनाचे दुर्लक्ष; नगरसेविका मानसी मुंज यांचा आरोप
*⚡कणकवली ता.०४-:* मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामांतर्गत कणकवली नरडवे रोडवरील श्रीधर नाईक चौकातील हायमास्ट काढण्यात आला. हा हायामास्ट श्रीधर नाईक पुतळ्यालगत असलेल्या फुटपाथवर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना फुटपाथवरून चालणे अवघड बनले आहे. हा हायमास्ट हटविण्याबाबत शिवसेनेच्या नगरसेविका मानसी मुंज यांनी नगरपंचायत प्रशासनाकडे मागणी केली होती. मात्र, त्यांच्या मागणीकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याची माहिती सौ.मुंज यांनी दिली. कणकवली येथील श्रीधर नाईक चौकात नगरपंचायतीच्यावतीने हायमास्ट उभारला होता. महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाअंतर्गत हा हायमास्ट ठेकेदार दिलीप बिल्डकॉन कंपनीकडून काढण्यात आला. तो हायमास्ट श्रीधर चौकालगत असलेल्या फुथपाटवर ठेवण्यात आला. त्यामुळे फुटपाथवरून ये-जा करणे अवघड बनले आहे.तसेच रात्रीच्या वेळेत विद्युत पुरवठा खंडित झाल्यास अपघात घडण्याची भीती आहे. तर हा फुटपाथ विरंगुळा केंद्र असल्याने याठिकाणी न.पं.तर्फे नागरिकांसाठी बसण्याची व्यवस्था केली आहे. त्यामुळे नेहमीच नागरिकांची याठिकाणी वर्दळ असते. त्याच ठिकाणी हायमास्ट ठेवण्यात आल्याने फुथपाथवरून चालणे नागरिकांना मुश्कील झाले आहे. ही बाब नागरिकांनी नगरसेविका मानसी मुंज यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर सौ. मुंज यांनी वाट अडविणारा हायमास्ट हटविण्याबाबत नगरपंचायत प्रशासनाने लक्ष वेधले होते. मात्र, प्रशासनाकडून हायमास्ट हटविण्याबाबत अद्यापही कार्यवाही झाली नसल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. लवकरात लवकर हा हायमास्ट हटवून फुथपाथ वरील अडचण दूर करावी, अशी मागणी सौ.मानसी मुंज व नागरिकांमधून होत आहे.
