उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांची पत्रकार परिषदेत टीका
मालवण (प्रतिनिधी) मालवण नगरपरिषदेचे नादुरुस्त झालेले अग्निशमन वाहन निर्लेखीत करून दोन वर्षापेक्षा जास्त कालावधी लोटला असताना आणि मुख्यमंत्री, पालकमंत्री, खासदार, आमदार हे सगळेच नगराध्यक्षांच्या पक्षाचे असतानाही गेली दोन वर्षे आपले वजन वापरून मालवणचे नगराध्यक्ष हे एक अग्निशमन वाहन आणू शकले नाहीत. हे नगराध्यक्ष कांदळगावकर यांच्या अकार्यक्षमतेचे द्योतक असल्याची टीका मालवणचे उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांनी पत्रकार परिषदेत केला. मालवण नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांनी पत्रकार परिषद घेत नगराध्यक्षांवर टीका केली. यावेळी गणेश कुशे यासह अन्य उपस्थित होते. यावेळी वराडकर म्हणाले, दोन वर्षे अग्निशमन वाहन आणू शकत नाहीत हेच नगराध्यक्ष यांचे शासन दरबारी वजन आहे का ? महेश कांदळगावकर हे प्रशासनाचा गाडा अभ्यास असलेले २० वर्षे अधिकारी होते. मात्र, त्यांच्या या अभ्यासाचा कोणताही फायदा शहराला झालेला नाही. मोठ्या आशेने निवडून दिलेल्या नगराध्यक्षांचा कार्यकाळ संपण्यास दोन महिने शिल्लक राहिले आहेत. शहरातील कचरा, स्ट्रीट लाईट, भटके कुत्रे, गुरे, ना मच्छरमुक्त शहर सर्वच प्रश्न जैसे थे आहेत. तीन वर्षांपूर्वी कचरा उचलण्यासाठी पाच नवीन घंटागाड्या खरेदी, ढकलगाड्या खरेदी केल्या. आवश्यक कर्मचारी घेतले. स्वच्छता अभियान राबविले. डम्पिंग ग्राऊंग मैदानासारखे स्वच्छ केले हे सर्व काही काळ चालले. हे सर्व पुढे का टिकू शकले नाही ? नव्याने खरेदी केलेल्या सक्शन वाहनाची अवस्था काय ? मैला टाकण्यासाठी बांधलेली टाकी भरलेली असते. आमदारांच्या हस्ते उदघाटन झालेल्या कचरा विलगिकरण प्रकल्पाचे काय झाले. त्यासाठी आणलेली मशीन आणि कचराही तिथेच पडून आहे. त्याठिकाणी अनेकवेळा आग लागली की लावली गेली ? असा सवाल राजन वराडकर यांनी उपस्थित केला. शहरातल्या समस्यांबाबत विचारले असता नगराध्यक्ष सांगतात मुख्याधिकारी ऐकत नाही. आणि मुख्याधिकारी सांगतात नगराध्यक्ष ऐकत नाही. या दोघांचे फक्त बिलं काढण्यासाठी एकमत होते असा टोला गटनेते गणेश कुशे यांनी यावेळी लगावला. शहरातील परिस्थिती न बदलल्यास पुढची पत्रकार परिषद डम्पिंग ग्राऊंडवर घेऊन त्याठिकाणी सर्व कारभाराचा पर्दाफाश करणार असल्याचा इशारा गणेश कुशे यांनी दिला.
