समाजामध्ये कायदेविषयक साक्षरता निर्माण व्हावी हाच अभियानाचा उद्देश

कायदेविषयक साक्षरता अभियान शिबिरप्रसंगी न्या. सलीम जमादार यांचे प्रतिपादन

*⚡कणकवली ता.०२-:* पॅन इंडिया जनजागृती व संपर्क अभियानाच्या माध्यमातून गावा – गावांमध्ये कायदेविषयक माहिती पोहोचविली जाणार आहे . कायदा सर्वांसाठी समान असून मोफतही आहे . अर्थात याविषयीच प्रत्येक गावामध्ये जनजागृती केली जाणार आहे . समाजामध्ये कायदेविषयक साक्षरता निर्माण व्हावी , हाच या अभियानाचा उद्देश असल्याची माहिती कणकवली दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश सलीम जमादार यांनी दिली. राष्ट्रीय स्तरावर पॅन इंडिया जनजागृती व संपर्क अभियान अर्थात कायदेविषयक साक्षरता अभियान शिबिर २ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर या कालावधील राबविले जाणार आहे . त्याचा कणकवली दिवाणी न्यायालय येथेही तालुका विधी सेवा समिती कणकवली व कणकवली वकील संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने शुभारंभ करण्यात आला , याप्रसंगी न्या . जमादार बोलत होते . महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभियानास प्रारंभ करण्यात आला . यावेळी कणकवली बार असोसिएशनचे अध्यक्ष व्ही . पी . चिंदरकर , तहसीलदार आर . जे . पवार , गटविकास अधिकारी अरूण चव्हाण , वकीलवर्ग , न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते . जमादार म्हणाले , तळागाळातील नागरिकांमध्ये विधीसाक्षरतेचा प्रसार व्हावा , त्यांना कायद्याचे ज्ञान मिळावे , हाच या मोहिमेचा उद्देश आहे . त्यानुसार कणकवली , वैभववाडी तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये जनजागृती करण्यात येणार आहे . यात पथनाट्यासारखे कार्यक्रम , कायदेविषयक शिबिरांचेही आयोजन करण्यात येणार आहे . कार्यक्रम प्रत्यक्ष तसेच वेबिनारच्या माध्यमातूनही आयोजित केले जाणार आहेत . त्यासाठी भित्तीचित्रके , फ्लेक्स , बॅनर याचे वितरणही गावा – गावामध्ये केले जाणार आहे . तळागाळातील नागरिकांनी कायदेविषयक ज्ञानापासून वंचित राहू नये . देशाच्या प्रत्येक भागापर्यंत कायदा पोहोचयला हवा . जनतेचे कायदेविषयक मागासलेपण दूर व्हावे , हाच या जनजागृती कार्यक्रमाचा उद्देश असल्याचे जमादार म्हणाले . शुभारंभप्रसंगी दिवाणी न्यायालय ते येथील आप्पासाहेब पटवर्धन चौक व परत दिवाणी न्यायालय अशी रॅलीही काढण्यात आली . रॅलीमध्ये वरील मान्यवरांसह सर्व न्यायालयीन कर्मचारी , वकील , अंगणवाडी सेविकाही सहभागी झाल्या होत्या . तसेच पॅन इंडिया जनजागृती ब संपर्क अभियानाचा राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या प्रमुख उपस्थित शुभारंभ झाला , तो देखील दिवाणी न्यायालय येथे ‘ युटूयब’च्या माध्यमातून ‘ एलईडी स्क्रीन’वर सर्वांनी ‘ लाईव्ह ‘ पाहीला .

You cannot copy content of this page