माजी खासदार निलेश राणे : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यामुळेच चिपी विमानतळ पूर्णत्वास
*⚡मालवण ता.३०-:* चिपी विमानतळ आम्ही आणले म्हणता मग विमानतळाकडे जाणारे रस्ते खड्डे मुक्त का देऊ शकले नाहीत ? विमानतळाकडे जाणारा शंभर मीटरचा रस्ता बिना खड्याचा नाही हे राज्य सरकारचे दुर्दैव आहे. विमानतळाला ते पाणी देऊ शकले नाहीत…, वीज देऊ शकले नाहीत…. असे सवाल उपस्थित करीत भाजपचे प्रदेश सरचिटणीस माजी खासदार निलेश राणे यांनी घणाघाती टीका करीत केंद्रीय मंत्री नारायण राणे हे मंत्री व्हावेत व त्यांनी ते विमानतळ मंजूर करून आणावे हेच नियतीला हवे होते अशी पुस्ती त्यांनी मालवण येथे बोलताना केले. मालवण येथील दामू तोडणकर यांच्या विघ्नहर्ता आपत्कालीन ग्रुपला भाजपचे प्रदेश सरचिटणीस माजी खासदार निलेश राणे यांनी रेस्क्यू व्हॅन दिली त्याचा लोकार्पण सोहळा आज सायंकाळी पार पडला. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, बाबा मोंडकर, बाबा परब, दामोदर तोडणकर, अशोक तोडणकर, जि. प. सदस्य संतोष साठविलकर, सभापती अजिंक्य पाताडे, विजय केनवडेकर, गणेश कुशे, आपा लुडबे, दीपक पाटकर, पूजा करलकर, जगदीश गावकर , हरीश गावकर, आशिष हडकर, विक्रांत नाईक आदी व इतर उपस्थित होते. यावेळी बोलताना माजी खासदार माजी निलेश राणे म्हणाले, चिपळूण मध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली असताना सुरुवातीच्या काळात एन.डी.आर. एफ ची टीम पोहोचू शकली नव्हती मात्र, मालवणचा आपत्कालीन ग्रुप हा चिपळूण येथे पूरग्रस्त भागात पोहोचून तेथे मदतकार्य करीत होता. या आपत्कालीन ग्रुपने अनेकांना वाचविले, अनेकांचे मृतदेह परतून बाहेर काढले, या आपत्कालीन ग्रुपचे जेवढे कौतुक करू तेवढे कमीच आहे असे गौरवोद्गार निलेश राणे यांनी काढले . ते पुढे म्हणाले जिल्हा रुग्णालयात आज जे कोरोना सेंटर उभं आहे ते मी खासदार असताना दिलं होतं. माझ्या निधीतून ते शंभर बेडचं हॉस्पिटल दिल होतं. आज त्याठिकाणी कोरोना सेंटर झाले. आणि मी निधी दिलेला असा लावण्यात आलेल्या माझ्या नावाच्या पाटीच्या खाली बसून इथला आमदार पावत्या फाडत होता अशी टीका करीत माजी खासदार निलेश राणे म्हणाले, आज पूर्ण जिल्हा ओसाड पडलाय. कुडाळ मालवणसह या मतदारसंघातील सर्वच रस्त्यांची दयनीय अवस्था झाल्याचे म्हणाले, यावेळी अशोक सावंत, दामोदर तोडणकर यांची समयोचित भाषणे झाली शेवटी श्री. विजय केनवडेकर यांनी आभार मानले.
