इंडोनेशिया कॉन्सुलेट जनरल अगुस साप्तानो
*⚡मालवण ता.२९-:* इंडोनेशियाचे कॉन्सुलेट जनरल अगुस साप्तानो व शिष्टमंडळाने महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सला भेट दिली व महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष श्री. संतोष मंडलेचा व पदाधिकाऱ्यांशी विविध विषयांवर चर्चा केली. इंडोनेशियाला भेट देण्यासाठी चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा व पदाधिकाऱ्यांना अधिकृत निमंत्रण त्यांनी दिले. तसेच आभासी स्वरूपात ३६ वे ट्रेड एक्सपो इंडोनेशिया प्रदर्शनात सहभागी होण्याचे आवाहन केले. तसेच महाराष्ट्र चेंबरच्या कार्याची माहिती घेऊन आंतरराष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्र चेंबर करत असलेल्या कार्याचे कौतुक करतानाच इंडोनेशिया व महाराष्ट्र राज्यात विद्यमान व्यापार आणि गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र चेंबरच्या सहकार्याने काम करू, असे अगुस साप्तानो यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष श्री. संतोष मंडलेचा यांनी इंडोनेशियाचे कॉन्सुलेट जनरल अगुस साप्तानो यांचे भगवदगीता, शाल देऊन स्वागत केले. महाराष्ट्र चेंबरच्या कार्याची माहिती दिली. राज्यासह परदेशात महाराष्ट्र चेंबर काम करत असून विविध देशांना भेटी दिल्या व व्यापार उद्योगाच्या विकासासाठी सामंजस्य करार केले असल्याची माहिती दिली. तसेच आभासी स्वरूपात ३६ वे ट्रेड एक्सपो इंडोनेशिया प्रदर्शनासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. ललित गांधी यांनी राज्यातील व्यापार-उद्योगाविषयी माहिती दिली. महाराष्ट्र चेंबरच्या माध्यमातून राज्यातील व्यापारी उद्योजकांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्थान मिळवून देण्यात चेंबर महत्वाची भूमिका बजावत असल्याचे सांगितले. बैठकीत प्रामुख्याने महाराष्ट्र चेंबरच्या सदस्यांना इंडोनेशियन व्यापार आणि गुंतवणुकीच्या संधींमध्ये प्रोत्साहन देण्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच महाराष्ट्र चेंबर य इंडोनेशिया कॉन्सुलेट जनरल एकत्रित काम करून व्यापार उद्योगांचा विकासासाठी प्रयत्न करतील असे ठरले. याप्रसंगी महाराष्ट्र चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी, विश्वस्त मंडळाचे चेअरमन आशिष पेडणेकर, उपाध्यक्ष रविंद्र माणगावे, बोना कुसुमा, तोल्हाह उबैदी, वाणिज्य सल्लागार पांगकी बी.पी. सपूत्र, सहाय्यक विजय व्ही. तावडे, कार्यकारिणी सदस्य राजन ठावकर, डी. सी. सोलंकी, प्रभारी सरकार्यवाह सागर नागरे, सचिव सौ. प्रेरणा उगले आदी उपस्थित होते.
